फुले मार्केट अडकले निविदेत!
By Admin | Updated: August 22, 2015 23:56 IST2015-08-22T23:44:11+5:302015-08-22T23:56:03+5:30
जालना : शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या महात्मा फुले मार्केटची जुनी इमारत पाडून पाच वर्षे उलटली तरी त्या जागी पालिकेकडून अद्यापही नवीन इमारत

फुले मार्केट अडकले निविदेत!
जालना : शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या महात्मा फुले मार्केटची जुनी इमारत पाडून पाच वर्षे उलटली तरी त्या जागी पालिकेकडून अद्यापही नवीन इमारत बांधण्यात आलेली नाही. दोनदा निविदा काढूनही उपयोग झालेला नाही. आता तिसऱ्यांदा निविदा निघणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.
सिंधी बाजार परिसरात दोनशेपेक्षा अधिक दुकाने असलेली महात्मा फुले मार्केटच्या इमारतीस साठ वर्षे झाल्याने ही इमारत जीर्ण झाली होती. ती कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता. व्यापारी व पालिका यांच्यातील दीर्घ चर्चेनंतर पाच वर्षांपूर्वी ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली. इमारत पाडल्यानंतर एखाद वर्षात ती तयार होईल, अशी अपेक्षा होती.
मात्र इमारत तयार न झाल्याने व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पालिकेच्या काही धोरणामुळे इमारतीचे भिजत घोंगडे कायम आहे. सदर इमारतीच्या बांधकामासाठी ई-टेंडर निघणार आहे. पाच मजल्यांची ही नवीन इमारत होणार आहे. साधारणपणे २८ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया आहे. जून व जुलै महिन्यात यासाठी निविदा काढण्यात आल्या. मात्र दोन्ही वेळेस कंत्राटदाराचा प्रतिसाद मिळाला नाही.
पालिकेचे अभियंता सय्यद सऊद म्हणाले, साधारण दीड एकरमध्ये पाच मजली हे मार्केट असणार आहे. यात २८३ दुकाने निघतील ती जुन्या दुकानदारांना देण्यात येतील. खाजगी कंत्राटदारास तीन, चार व पाचव्या मजला देण्यात येणार आहे. वाहनतळामध्ये १६६ कार व ६६ दुचाकींची क्षमता आहे. आठवडाभरात तिसऱ्यांना निविदा काढण्यात येणार असून, कंत्राटदार न मिळाल्यास शासनाकडे अटी व शर्थी शिथील करण्याची मागणी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)