सिकंदरपूरच्या फुलांचा सुगंध काश्मीरात
By Admin | Updated: February 14, 2016 00:01 IST2016-02-14T00:01:50+5:302016-02-14T00:01:50+5:30
बाळासाहेब जाधव , लातूर लातूर तालुक्यातील सिकंदरपूरच्या एका महिला शेतकऱ्याने पॉलीहाऊस उभारून एक एकर गुलाब शेती केली आहे. व्हॅलेण्टाईन डेच्या निमित्ताने गुलाबाच्या फुलांना अचानकपणे मागणी वाढली.

सिकंदरपूरच्या फुलांचा सुगंध काश्मीरात
बाळासाहेब जाधव , लातूर
लातूर तालुक्यातील सिकंदरपूरच्या एका महिला शेतकऱ्याने पॉलीहाऊस उभारून एक एकर गुलाब शेती केली आहे. व्हॅलेण्टाईन डेच्या निमित्ताने गुलाबाच्या फुलांना अचानकपणे मागणी वाढली. परिणामी, सिकंदरपूरच्या फुलांचा सुगंध दिल्ली, जम्मू काश्मीरच्या बाजारातही दरवळला आहे. येथून दररोज दोन हजार गुलाब पुष्प बाजारात विक्रीसाठी जात आहेत.
१२ वीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सिंधुताई उगिले यांनी एक एकर शेतीवर गुलाबांची लागवड केली. याकामी त्यांचे पती दिलीप उगिले यांचीही त्यांना खंबीर साथ आहे. त्यामुळेच पॉलीहाऊसची ही शेती अत्यंत बहरात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून येथील फुले दिल्ली, जबलपूर, जम्मू काश्मीरच्या बाजारात विक्रीसाठी जात आहेत. २०१३ साली पॉलीहाऊस उभे करून २०१४ मध्ये गुलाबाची लागवड करण्यात आली. वर्षभरानंतर शेती चांगलीच बहरात आली. दररोज दीड ते दोन हजार फुलांचा सुगंध दरवळू लागला. हा सुगंध केवळ लातूरपर्यंत मर्यादित न राहता जम्मू काश्मीरपर्यंत गेल्याने या महिला शेतकऱ्याचे कौतुक होत आहे.