डास पळवा; डेंग्यू कळवा

By Admin | Updated: November 6, 2014 01:36 IST2014-11-06T00:41:37+5:302014-11-06T01:36:57+5:30

बीड : साथरोगांच्या थैमानाचे वास्तव चित्र ३१ आॅक्टोबर रोजी ‘लोकमत’ने समोर आणले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी

Flee the mosquito; Report dengue | डास पळवा; डेंग्यू कळवा

डास पळवा; डेंग्यू कळवा


बीड : साथरोगांच्या थैमानाचे वास्तव चित्र ३१ आॅक्टोबर रोजी ‘लोकमत’ने समोर आणले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बुधवारी आरोग्य विभागाची तातडीची बैठक घेतली. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले. डासांचा नायनाट करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करा असे सांगून डेंग्यूचे निदान झाल्यास खाजगी डॉक्टरांनी प्रशासनाला कळवावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी राम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ .महानंदा मुंडे, न. प. मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. यू. डी. कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यामध्ये चालू वर्षी २४ गावांमध्ये साथरोगाचा उद्रेक झाला. डेंग्यू, चिकुन गुनिया या आजाराचे ४४३ रूग्ण आढळून आले. त्यापैकी चौघांना जीव गमवावा लागला. ४४३ पैकी १४७ रूग्णांचे रक्त नमुने तपासले असता ४२ नमुने हे डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आले तर ३८ नमुने हे चिकुन गुनिया पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे आरोग्य विभागाने गांभिर्याने साथरोग नियंत्रण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या.
प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये २४ तास सेवा द्या, कोठेही हलगर्जीपणा चालणार नाही, असेही राम म्हणाले. खाजगी दवाखान्यात जाणाऱ्या रुग्णांची नोंद आरोग्य विभागाकडे होत नाही. त्यामुळे रुग्णांनी खाजगी दवाखान्यात तपासण्या केल्यानंतर प्रयोगशाळांनी त्याचा अहवाल जिल्हा शल्य चिकित्संकाकडे पाठवावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
जनजागृतीवर भर
साथरोग निर्मूलनासाठी अंगणवाडीताई, शिक्षण विभाग, आशा कार्यकर्ती यांची मदत घ्यावी, असे जिल्हाधिकारी राम यांनी सुचवले. जनजागृती करून स्वच्छतेचे महत्व पटवून द्या, असे ते म्हणाले. साथरोग निर्मूलनासंदर्भात अहवाल दोन दिवसात सादर करा, अशा सूचना त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, शल्य चिकित्सक यांना दिल्या.(प्रतिनिधी)
जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची सहा पथके नेमण्यात आली आहेत.
४या अधिकाऱ्यांकडे तालुकानिहाय जबाबदारी सोपविली आहे.
४जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. के. एस. आंधळे, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) चे सहा. संचालक डॉ. डी. बी. मोटे, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गणेश लोखंडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रदीप वैष्णव, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांचा समावेश आहे.
साथ रोग नियंत्रणाबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. जनतेने घाबरून जाऊ नये. ताप डेंग्यूचाच असेल असे नाही. अनधिकृत व्यक्तींकडून उपचार घेऊ नयेत. वेळीच नजीकच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी
वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना आहेत. अबेटिंग पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी कोरडा दिवस पाळून डासांचा नायनाट करावा.
- डॉ. एच. व्ही. वडगावे,
जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: Flee the mosquito; Report dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.