पाच वर्षांत वाढला दुपटीने निकाल !
By Admin | Updated: June 3, 2014 00:45 IST2014-06-03T00:25:38+5:302014-06-03T00:45:46+5:30
भालचंद्र येडवे , लातूर विभागीय मंडळाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांमुळे गत पाच वर्षात या विभागाचा निकाल दुपटीने वाढल्याचे चित्र निकालाअंती स्पष्ट झाले़

पाच वर्षांत वाढला दुपटीने निकाल !
भालचंद्र येडवे , लातूर एकेकाळी या ना त्या कारणाने संपूर्ण राज्यभर गाजत असलेल्या लातूर विभागीय मंडळाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांमुळे शिवाय विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी घेतलेल्या परीक्षेच्या गांभीर्यामुळेच गत पाच वर्षात या विभागाचा निकाल दुपटीने वाढल्याचे चित्र सोमवारी निकालाअंती स्पष्ट झाले़ लातूर विभागीय मंडळांतर्गत असलेल्या नांदेड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्याच्या गत पाच वर्षाच्या निकालावर नजर मारली असता मार्च २०१० मध्ये ४७़५९ टक्क्यांवरून मार्च २०१४ मध्ये ९०़६० वर हा निकाल जाऊन पोहोचला आहे़ दरवर्षी लातूर विभागाच्या निकालाचा आलेख वाढतच आहे़ २०१० मध्ये ४७़५९, २०११ - ५६़५७, २०१२ - ७५़४६, २०१३ - ८३़५४ तर २०१४ मध्ये ९०़६० टक्यांवर जावून पोहोचला आहे़ चार ते पाच वर्षांपूर्वी मास कॉपी व शेकडोंवर गैरप्रकार होत असलेल्या या विभागात आता गैरप्रकाराची आकडेवारीही नगण्य होत चालली आहे़ यंदा मार्च २०१४ मध्ये केवळ २२ विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आले़ त्यात लातूर ८, नांदेड ४ तर उस्मानाबाद १० अशी संख्या आहे़ याची टक्केवारी पाहिली असता ०़०३ अशी आहे़ या निकालाचे विशेष वैशिष्ट्ये म्हणजे विभागात एकही शाळा शून्य टक्के निकाल असलेली उपलब्ध नाही, असा दावाही मंडळाने केला. (कौतुक गुणवंतांचे हॅलो ३ वर) सकारात्मक बदल... परीक्षेतील प्रतिबंधक उपाययोजना म्हणून मंडळाने यंदा राज्यात पहिल्यांदाच एक उपक्रम हाती घेतला आहे़ लातूर विभागीय मंडळातील अधिकारी- कर्मचार्यांची विशेष पथके नेमून प्रत्येक केंद्रावर या पथकांना परीक्षा संपेपर्यंत थांबण्याबाबत सूचना दिल्या होत्या़ शिवाय, अचानकपणे परीक्षा संपल्याबरोबर कोणत्याही एका केंद्रावरील संपूर्ण उत्तर पत्रिका आपल्या ताब्यात घेत हे पथक थेट मंडळ गाठले़ मंडळ अचानकपणे राबवित असलेल्या या उपक्रमामुळे परीक्षेशी संबंधित घटकांच्या विशिष्ट वैचारिक मनोवृत्तीमध्ये सकारात्मक बदल व गैरप्रकार कमी होण्यास मदत झाल्याचा दावाही मंडळ करीत आहे़ वाणिज्य शाखेचा सर्वाधिक निकाल लागला असून, ९२़९० टक्के या शाखेची टक्केवारी आहे़ त्यापाठोपाठ विज्ञान शाखेचा क्रमांक लागतो़ लातूर विभागात विज्ञान शाखेचा ९२़३७, कला ८८़५७, वाणिज्य ८२़९०, एचएससी व्होकेशनल ८८़३९ असा निकाल लागला आहे़ चित्रिकरण केलेल्या परीक्षा केंद्रांची चौकशी बारावी परीक्षेदरम्यान, संपूर्ण राज्यभरात ३१७ परीक्षा केंद्रांचे चित्रिकरण करण्यात आले होते. पैकी लातूर विभागातील १८९ केंद्रांपैकी काही उपद्रवी केंद्रांसह एकूण ५१ केंद्रांचे चित्रिकरण करण्यात आले आहे. कोणत्याही क्षणी या केंद्रांची चौकशी होईल, असे मंडळाच्या सूत्रांकडून समजते. लातूर जिल्ह्यात २४३ कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ७६ केंद्रांवर परीक्षा झाली. २८ हजार ९२६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २८ हजार ८५५ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. त्यातील २६ हजार ४३९ विद्यार्थी यशस्वी झाले असून, लातूर जिल्ह्याचा ९१.६३ टक्के निकाल लागला आहे. मुलींचा टक्का वाढताच ! बारावीच्या परीक्षेत विभागामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही निकालात मुलींचा टक्का वाढता आहे. विभागात परीक्षेस बसलेल्या मुलां-मुलींपैकी मुलांची टक्केवारी ८८.४५ तर मुलींची ९३.७९ टक्के आहे. याही परीक्षेत ६ टक्क्यांनी मुली पुढे आहेत.