दुधाळ जनावरे, शेळ्या मेंढ्यांसाठी पाच हजार अर्ज
By Admin | Updated: September 28, 2016 00:47 IST2016-09-28T00:18:09+5:302016-09-28T00:47:00+5:30
औरंगाबाद : नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत दुधाळ जनावरे आणि शेळ्या मेंढ्या मिळविण्यासाठी जिल्हाभरातील तब्बल सव्वापाच हजार लोकांनी अर्ज दाखल केले आहेत.

दुधाळ जनावरे, शेळ्या मेंढ्यांसाठी पाच हजार अर्ज
औरंगाबाद : नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत दुधाळ जनावरे आणि शेळ्या मेंढ्या मिळविण्यासाठी जिल्हाभरातील तब्बल सव्वापाच हजार लोकांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्जांच्या छाननीनंतर लॉटरी पद्धतीने चिठ्ठ्या काढून लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
पशुसंवर्धन खात्यातर्फे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नावीन्यपूर्ण ही वैयक्तिक लाभाची योजना राबविली जाते. यामध्ये लाभार्थ्यांना दुधाळ संकरित गायी, म्हशी तसेच शेळ्या मेंढ्यांच्या गटाचे वाटप केले जाते. शिवाय शेडच्या बांधकामासाठी ठराविक अनुदान देण्यात येते. सर्वसाधारण, अनुसूचित जाती, आदिवासी जमाती संवर्गांसाठी ही योजना लागू आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रकल्प किमतीच्या ५० टक्के अनुदान तर अनुसूचित जाती, आदिवासी जमातीसाठी प्रकल्प किमतीच्या ७५ टक्के इतके अनुदान देय आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने प्रयत्नशील असतात. यंदाही जिल्ह्यात या योजनेअंतर्गत नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतून मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. गायी म्हशींच्या गटांत १६४९ आणि शेळी मेंढीच्या गटात ३५८२ जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या सर्व अर्जांची छाननी करण्यात येत आहे. छाननीनंतर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. साधारणत: दिवाळीआधी हा ड्रॉ काढण्यात येईल.