पाच तालुक्यांना नगर पंचायतींची प्रतीक्षा !
By Admin | Updated: January 29, 2015 01:15 IST2015-01-29T01:05:23+5:302015-01-29T01:15:08+5:30
लातूर : आघाडी शासनाने तालुक्याच्या ठिकाणी व तीर्थक्षेत्र असलेल्या गावांच्या ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा देण्याचा निर्णय जाताजाता घेतला होता़

पाच तालुक्यांना नगर पंचायतींची प्रतीक्षा !
लातूर : आघाडी शासनाने तालुक्याच्या ठिकाणी व तीर्थक्षेत्र असलेल्या गावांच्या ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा देण्याचा निर्णय जाताजाता घेतला होता़ मात्र या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झाली नसून ना अधिसूचना ना हरकती घेतल्या़ तरीही लातूर जिल्ह्यातील पाच तालुक्याच्या ग्रामपंचायतींना नगर पंचायतीची प्रतीक्षा आहे़ नगर पंचायतीचा दर्जा मिळाल्यास मनुष्यबळासह विकास साधता येईल, अशी आशा या ग्रामपंचायतींना आहे़
लातूर जिल्ह्यातील देवणी, जळकोट, शिरुर अनंतपाळ, चाकूर, रेणापूर या पाच तालुक्याच्या ठिकाणी ग्रामपंचायती आहेत़
या तालुक्यांना आघाडी शासनाच्या निर्णयानुसार नगर पंचायतीचा दर्जा मिळणार आहे़ परंतु या निर्णयाच्या अनुषंगाने अद्याप शासन स्तरावरुन कोणताही अध्यादेश स्थानिक प्रशासनाला प्राप्त झाला नाही़ शासनाकडून नगर पंचायतीसाठी अधिसूचनाही नाही़ त्यामुळे हारकती मागविल्या नाहीत़
प्रथम आणि द्वितीय अधिसूचना शासनाकडून जाहीर होते़ मात्र ती नव्या शासनाकडून जाहीर झालेली नाही़ त्यामुळे सध्या तरी या ग्रामपंचायतींना शासन निर्णयाची प्रतीक्षा आहे़ प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या आणि तीर्थक्षेत्र असलेल्या ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा देण्याचे निर्णय आघाडी शासनाने केले होते़ मात्र या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याने पाचही तालुक्यांत नाराजीचा सुर उमटत आहे़ (प्रतिनिधी)
नगर पंचायत झाल्यास मनुष्यबळाची शासनाकडून पूर्तता होते़ नगर पंचायतींना शासनाचा मुख्याधिकारी मिळतो़ वेगवेगळे टॅक्स वसूल करण्याचा अधिकार प्राप्त होतो़ त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून गावाचा विकास साधता येतो़ गावातील बांधकामांवर, रस्त्यांवर नियंत्रण ठेऊन विकास साधता येतो़ परंतु या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे रेणापूर, जळकोट, देवणी, शिरुर अनंतपाळ, चाकूर या ग्रामपंचायतींना आघाडी शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणीची प्रतीक्षा आहे़ निर्णय आघाडी शासनाचा असो की विद्यमान शासनाचा असोे, ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा देण्याचा निर्णय विकासाच्या प्रवाहात नेणारा आहे, असे मत या पाचही ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी व्यक्त केले आहे़ या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षाही विद्यमान सरपंचांनी व्यक्त केली आहे़