‘स्वाईन’चे पाच संशयित दाखल
By Admin | Updated: March 28, 2015 00:42 IST2015-03-28T00:19:56+5:302015-03-28T00:42:53+5:30
उस्मानाबाद : उन्हाचा पारा ४० अंशावर गेल्याने स्वाईन फ्लूचा प्रभाव कमी होईल, अशी आशा फोल ठरताना दिसत आहे़

‘स्वाईन’चे पाच संशयित दाखल
उस्मानाबाद : उन्हाचा पारा ४० अंशावर गेल्याने स्वाईन फ्लूचा प्रभाव कमी होईल, अशी आशा फोल ठरताना दिसत आहे़ जिल्हा रूग्णालयात गुरूवारी व शुक्रवारी स्वाईन फ्लू संशयित म्हणून पाच जण दाखल झाले आहेत़ तर गंभीर प्रकृती असलेल्या दोन महिलांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत़
फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभीपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या स्वाईन फ्लूचा जिल्ह्यात झालेला फैलाव अद्यापही कमी होताना दिसत नाही़ या आजाराने आजवर जिल्ह्यात सात जणांचे बळी घेतले आहेत़ तर पॉझिटीव्ह रूग्ण आढळलेल्या चौघांची प्रकृती सुधारली आहे़ जिल्हा रूग्णालयात आजवर एकूण ५८ रूग्ण संशयित म्हणून उपचारासाठी दाखल झाले आहेत़ यामध्ये गुरूवारी उकडगाव (ता़बार्शी) येथील एक ५४ वर्षीय महिला, सोनेगाव येथील एक ४५ वर्षीय महिला दाखल झाली आहे़ या दोघींचे स्वॅब घेवून तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत़ तर शुक्रवारी तिघे संशयित रूग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत़ यात अनसुर्डा येथील एक ६० वर्षीय वृद्ध, उस्मानाबाद शहरातील सांजा चौक येथील एक ५७ वर्षीय इसम व शहरातीलच जुना बसडेपो भागातील एक ५८ वर्षीय इसम उपचारासाठी दाखल झाला आहे़ या सर्वांवर उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले़ (प्रतिनिधी)