अत्याधुनिक रुग्णालयासाठी पाच मजली वास्तू साकारणार
By Admin | Updated: December 5, 2014 00:53 IST2014-12-05T00:38:37+5:302014-12-05T00:53:11+5:30
हणमंत गायकवाड , लातूर पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी तत्वत: मान्यता दिली असून,

अत्याधुनिक रुग्णालयासाठी पाच मजली वास्तू साकारणार
हणमंत गायकवाड , लातूर
पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी तत्वत: मान्यता दिली असून, या हॉस्पिटलची ५ मजली स्वतंत्र वास्तू साकारणार आहे. केंद्र शासनाच्या बांधकाम एजन्सीने जागेची पाहणी केली असून, आराखडाही तयार केला आहे.
पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात औरंगाबाद, यवतमाळ, अकोला आणि लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी २१० खाटांचे स्वतंत्र सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर केले आहे. जागा राज्य शासनाची आणि बांधकाम खर्च केंद्र शासनाचा असणार आहे. १५० कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक हॉस्पिटल बांधून दिले जाणार आहे. या हॉस्पिटलमध्ये एकूण ७ विभाग असणार आहेत. त्यात कार्डियोलॉजी (हार्ट), सीव्हीटीसी कार्डियो व्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जरी, न्युरॉलॉजी (मेंदू विकार), न्यूरोसर्जरी, नेफ्रॉलॉजी (किडणी), नेप्थॉलॉजी (नवजात), प्लॅस्टिक अॅण्ड बर्न (जळित रुग्ण) या सात विभागांचा त्यात समावेश असेल. या विभागात प्रती ५० खाटा असतील. शिवाय, दहा खाटा क्रिटीकल रुग्णांसाठी असतील. रुग्णालयाच्या बांधकामासाठी ८० कोटी आणि यंत्र सामुग्रीसाठी ७० कोटींचा खर्च केंद्र शासनाच्या वतीने केला जाणार आहे. बांधकामाची सर्व जबाबदारी केंद्र शासनाने घेतली असून, केंद्राच्या बांधकाम एजन्सीने लातुरातील स्त्री रुग्णालय परिसरातील जागेची पाहणी करून रुग्णालयाचा आराखडाही तयार केला आहे.
आॅल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूट (एम्स) च्या धर्तीवर रुग्णालय होणार आहे. केंद्र शासन बांधकाम आणि यंत्रसामुग्रीचा खर्च करणार असून, मनुष्यबळ आणि देखभाल दुरुस्ती राज्य शासनावर सोपविण्यात आली आहे. औरंगाबाद आणि लातुरात पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजनेतून हे हॉस्पिटल बांधून मिळणार असल्याची माहिती अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ. श्रीकांत गोरे यांनी दिली. ४
तत्कालीन कस्तुरबा गांधी स्त्री रुग्णालयाच्या जागेत सध्या जिल्हा शल्य चिकित्सक, औषधी भांडार व सर्वोपचार रुग्णालयाचा नेत्र विभाग आहे. तसेच जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयालगत विक्रीकर कार्यालय आहे. या सर्व कार्यालय प्रमुखांची जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी बैठक घेतली असून, त्यांना जागा खाली करण्यासंदर्भात सुचित केले आहे. पुढील दोन दिवसांत पुन्हा जिल्हाधिकारी त्यांची बैठक घेऊन म्हणणे जाणून घेणार आहेत. मार्च-एप्रिल २०१५ मध्ये या जागेवर प्रत्यक्ष बांधकामाला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. ४
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामासाठी केंद्राने मोठा निधी देण्यासाठी मान्यता दिली असली तरी दोन एकर जागेची अट घातली होती. दरम्यान, महाविद्यालयाने जुन्या कस्तुरबा गांधी रुग्णालयासह जिल्हा शल्य चिकित्सक व विक्रीकर विभागाच्या कार्यालयाची जागा दाखविल्याने केंद्राने मंजुरी दिली आहे. परंतु, ऐतिहासिक वास्तूचा अडसर आहे. कस्तुरबा गांधी रुग्णालयाची इमारत १९३२ ची आहे. ती वास्तू ऐतिहासिकमध्ये येते का यासंबंधीची पडताळणी जिल्हाधिकाऱ्यांकडून सुरू आहे.