५६ टेबलवर होणार मतमोजणीच्या पाच फेऱ्या
By | Updated: December 4, 2020 04:07 IST2020-12-04T04:07:16+5:302020-12-04T04:07:16+5:30
औरंगाबाद: मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी ३ लाख ७३ हजार १६६ पैकी २ लाख ४० हजार ७९६ मतदारांनी मंगळवारी मतदान ...

५६ टेबलवर होणार मतमोजणीच्या पाच फेऱ्या
औरंगाबाद: मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी ३ लाख ७३ हजार १६६ पैकी २ लाख ४० हजार ७९६ मतदारांनी मंगळवारी मतदान केल्यानंतर आता मतमोजणीची उत्सुकता लागलेली आहे. ५६ टेबलवर मतमोजणीच्या पाच फेऱ्या होणार असून त्यामध्ये वैध मतांची बेरीज करून पहिल्या पसंतीच्या मतानुसार विजयी होण्यासाठी कोटा ठरेल. वैध मतांच्या संख्येला दोनने भागून त्यात १ अधिक केल्यानंतर जी संख्या येईल, ती संख्या विजयासाठी कोटा म्हणून निश्चित करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.
महाविकास आघाडी विरुध्द महायुती असा प्रचार या निवडणुकीत झाल्यामुळे मतदारांनी कोणत्या राजकीय समीकरणांचा स्वीकार केला आहे, त्याची चंचुपरीक्षादेखील या निवडणुकीच्या निकालावरून होणार आहे.
सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होताच सर्व मतपेट्यांमधील मतपत्रिका या एका दहा बाय दहाच्या मिक्सिंग ड्रममध्ये टाकण्यात येतील. त्यानंतर दोन सभागृहांमध्ये प्रत्येकी २८ टेबलवर २५ मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे मोजणी केली जाईल. हे करीत असतानाच वैध मतपत्रिका काढण्यात येतील. त्यानंतर ३५ उमेदवारांच्या पसंतीनुसार मतपत्रिका पिजन बॉक्समध्ये वर्ग करण्यास सुरुवात होईल. येथूनच खरी मतमोजणी सुरू होईल. या सगळ्या प्रक्रियेला रात्री ८ वाजेपर्यंत वेळ लागेल. तोपर्यंत वैध मतांचा कोटा आणि विजयासाठी लागणाऱ्या एकूण मतदानाचा आकडा समोर येईल.
कोटा पूर्ण झाला नाहीतर दुसऱ्या पसंतीसाठी मोजणी
विजयी मतांचा कोटा पहिल्या फेरीत पूर्ण झाला नाहीतर दुसऱ्या पसंतीची मतमोजणी (नेक्स्ट अव्हेलेबल प्रीफे्रंस) सुरू करण्यात येईल. यात ३३ उमेदवारांचे ईलीमेनेशन सुरू होईल. दोन उमेदवारांपैकी ज्याचा कोटा पूर्ण होईल. तो विजयी होईल. समान मते मिळाल्यास टॉस करून निर्णय घेतला जाईल. १ हजार मतपत्रिकांमागे १ सुपरवायझर, ३ सहायक कर्मचारी असतील. पहिली पसंती आणि थेट तिसरी पसंती दिलेली असेल तर सदरील मतपत्रिका एक्झहॉस्टेड ठरविण्यात येईल.
मतमोजणी अशी होणार
मराठवाडा रिअल्टर्स प्रा. लि. चिकलठाणा येथे सकाळी ८ वा. होणार सुरुवात
किती कर्मचारी
५०७
मतमोजणीच्या फेऱ्या किती
पाच फेऱ्या होणार
किती उमेदवार रिंगणात
३५ उमेदवार
किती टेबल मोजणीसाठी
५६ टेबल
दोन हॉलमध्ये सोबत मोजणी
२८ टेबल एका हॉलमध्ये
कोटा पूर्ण न झाल्यास काय
दुसऱ्या पसंतीसाठी मतमोजणी