शहरात पाच नवीन अग्निशमन केंद्रे उभारा
By Admin | Updated: November 3, 2016 01:35 IST2016-11-03T01:27:59+5:302016-11-03T01:35:20+5:30
औरंगाबाद : जिल्हा परिषद मैदानावर फटाका बाजाराला लागलेल्या आगीमुळे शहरातील अग्निशमन सेवेचा मुद्या ऐरणीवर आला असून,

शहरात पाच नवीन अग्निशमन केंद्रे उभारा
औरंगाबाद : जिल्हा परिषद मैदानावर फटाका बाजाराला लागलेल्या आगीमुळे शहरातील अग्निशमन सेवेचा मुद्या ऐरणीवर आला असून, शहरात वेगवेगळ्या भागांत त्वरित पाच अग्निशमन केंद्रे उभारण्यात यावीत, असे आदेश मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी बुधवारी दिले. नवीन केंद्रे उभारण्यासाठी त्वरित निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
जिल्हा परिषद मैदानावर लागलेल्या आगीत १२ कोटींहून अधिक मालमत्ता खाक झाली. शासनस्तरावर मनपाला प्रचंड मोठ्या प्रमाणात नामुष्कीचा सामना करावा लागत आहे. आग लागल्यानंतर मनपाला किमान पाच ते दहा दुकाने तरी वाचविता आली असती तर मोठे यश असते. मनपाच्या अग्निशमन दलाला एकही दुकान वाचविण्यात यश आले नाही. अग्निशमन दलाचा भोंगळ कारभार लक्षात घेऊन आयुक्त बकोरिया यांनी तीन दिवसांपूर्वीच अग्निशमन दलाचे प्रमुख शिवाजी झनझन यांना निलंबित केले. अग्निशामक यंत्रणा पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी शासनाने तीन वर्षांपूर्वीच मनपाला ५ नवीन अग्निशमन केंद्रे उभारा असे आदेश दिले.
शहरात पाच ठिकाणी अग्निशमन केंद्राच्या उभारणीसाठी सुमारे ५ कोटींचा निधी अपेक्षित असून, या कामासाठी लवकरच निविदा मागविल्या जाणार असल्याची माहिती आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिली. ते म्हणाले, नगरविकास विभागाकडून शहरात अग्निशमन यंत्रणा गतिमान करण्यासाठी ५ नवीन केंद्रांना मंजुरी मिळाली आहे.
अग्निशमन विभागाने ५५ पदांची गरज असल्याचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. शासनाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, ५५ पैकी २६ पदे तात्काळ भरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. उपमुख्य अग्निशमन अधिकारी, मुख्य अग्निशामक, अग्निशामक, वाहनचालक आणि आॅपरेटर, अशी पदे आहेत. शासन निर्णयानुसार शहरात आपत्ती व्यवस्थापन केंद्रही उभारण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्तांनी नमूद केले.