पाच मेडिकलचे परवाने निलंबित

By Admin | Updated: September 13, 2015 00:03 IST2015-09-13T00:02:39+5:302015-09-13T00:03:21+5:30

उस्मानाबाद : औषधी दुकानांमध्ये फार्मासिस्ट असणे बंधनकारक असतानाही फार्मासिस्टच्या अनुपस्थितीत औषधविक्री करणाऱ्या जिल्ह्यातील

Five Medical Licenses Suspended | पाच मेडिकलचे परवाने निलंबित

पाच मेडिकलचे परवाने निलंबित


उस्मानाबाद : औषधी दुकानांमध्ये फार्मासिस्ट असणे बंधनकारक असतानाही फार्मासिस्टच्या अनुपस्थितीत औषधविक्री करणाऱ्या जिल्ह्यातील पाच औषधी दुकानदारांचे परवाने काही दिवसांसाठी बंद करण्यात आले आहेत़ तर तीन दुकानदारांचे परवाने विविध कारणांनी रद्द करण्यात आले आहेत़ ही कारवाई आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात करण्यात आली आहे़
विविध आजारांनी ग्रासलेले रूग्ण खासगी, सरकारी रूग्णालयात उपचारासाठी धाव घेतात़ सरकारी रूग्णालयात औषधे मिळाली नाहीत तर औषधे खरेदी करण्यासाठी खासगी औषधी दुकानांकडे रूग्णांसह नातेवाईकांचा ओढा असतो़ औषधे खरेदी करण्यासाठी येणाऱ्या रूग्णांना चुकीची औषधे जावू नये, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ‘स्प्रिस्क्रीप्शन’ नुसार औषधे देण्यात यावीत, यासाठी संबंधित औषधी दुकानांमध्ये ‘फार्मासिस्ट’ असणे बंधनकारक करण्यात आले आहे़ मागील काही वर्षापासून याबाबत औषध प्रशासनाकडून सक्तीच्या सूचना देवून वेळोवेळी तपासणीही करण्यात येत आहे़ मात्र, सूचनांचे पालन न करता फार्मास्टि नसतानाही काही औषधी दुकानातून औषधे देण्यात येत असल्याचे तपसणीदरम्यान समोर आले होते़ त्यामुळे फार्मासिस्ट अनुपस्थित असलेल्या पाच औषधी दुकानांचे परवाने दोन ते २५ दिवस या दरम्यानच्या काही कालावधीपुरते निलंबीत करण्यात आले आहेत़ यात उस्मानाबाद येथील सुमित मेडिकोचे १० आॅक्टोबरपासून दोन दिवस, नेहरू चौकातील लाईप मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्सचे १० आॅक्टोबर पासून ५ दिवसांचे, आझाद चौकातील मेट्रो मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्ससचे १० आॅक्टोबर पासून २५ दिवस, मुरूम येथील बसवराज मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्सचे १० आॅक्टोबर पासून ५ दिवसांचे तर इंदापूर येथील राजमाता मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्सचे १५ आॅक्टोबर पासून २५ दिवसांच्या कालावधीसाठी परवाना निलंबित करण्यात आला आहे़ तर १० आॅक्टोबरपासून उस्मानाबाद शहरातील भवानी चौकातील सुश्रुषा मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, ढोकी येथील प्रगती मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स परवाना व कळंब येथील युनायटेड मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स या तीन औषधी दुकानांचे परवाने कारणे दाखवा नोटिसीचा खुलासा न देणे, नवीनकरण अर्ज सादर न केल्यामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त काळे यांनी दिली़
औषधी दुकानात फार्मासिस्ट ठेवून औषधे विक्री करणे बंधनकारक आहे़ औषध प्रशासनाकडून वेळोवेळी औषधी दुकानांची तपासणी करण्यात येत आहे़ ज्या औषधी दुकानात फार्मासिस्ट अनुपस्थित असल्याचे दिसून येईल, अशा दुकानांवर परवाने निलंबनाची कारवाई यापुढेही करण्यात येणार असल्याची माहिती औषध प्रशासनचे सहायक उपायुक्त काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़
येथील सहाय्यक अन्न व औषध प्रशासन विभागात एकूण १५ पदे मंजूर आहेत़ यातील १० पदे भरण्यात आली असून, इतर पाच पदे रिक्त आहेत़ यात वर्ग एक व दोन व चारचे प्रत्येकी एक तर वर्ग तीनचे दोन पदे रिक्त आहेत़ रिक्त पदांमुळे काही वेळा कामकाजातही विस्कळीतपणा येत असल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले़

Web Title: Five Medical Licenses Suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.