पाचशे गावांना चारशे टँकरने पाणी
By Admin | Updated: June 2, 2014 01:35 IST2014-06-02T01:31:59+5:302014-06-02T01:35:13+5:30
औरंगाबाद : मेअखेरीस मराठवाड्यातील पाणीटंचाईने आणखीनच भीषण स्वरूप धारण केले आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत विभागातील टँकरची संख्या १४४ ने वाढली आहे.

पाचशे गावांना चारशे टँकरने पाणी
औरंगाबाद : मेअखेरीस मराठवाड्यातील पाणीटंचाईने आणखीनच भीषण स्वरूप धारण केले आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत विभागातील टँकरची संख्या १४४ ने वाढली आहे. सध्या विभागात एकूण ३९५ टँकरच्या माध्यमातून पाचशे गावांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मराठवाड्यात यंदाही जानेवारी महिन्यापासूनच पाणीटंचाई जाणवत आहे. मात्र, सुरुवातीला टंचाईची तीव्रता काही गावांपुरतीच मर्यादित होती. एप्रिल महिन्यापासून ही तीव्रता वाढली असून, दिवसेंदिवस नवनवीन गावे पाणीटंचाईच्या फेर्यात येत आहेत. मागील आठवड्यात मराठवाड्यात २५१ टँकर सुरू होते. चालू आठवड्यात ही संख्या ३९५ झाली आहे. परभणी आणि हिंगोली हे दोन जिल्हे वगळता इतर सहा जिल्ह्यांमध्ये सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक १३५ गावांना १७७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर सर्वात कमी ५ टँकर लातूर जिल्ह्यात सुरू आहेत. टँकरशिवाय अनेक गावांत त्याच ठिकाणी विहिरी अधिग्रहित करूनही पाणीपुरवठा केला जात आहे. विभागात एकूण ६९९ खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात २३९, जालना जिल्ह्यात १६, नांदेड जिल्ह्यात १४, बीड जिल्ह्यात २६६, लातूर जिल्ह्यात ४५ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ११९ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. मागील आठवड्यात अधिग्रहित विहिरींची संख्या ३७२ होती. चालू आठवड्यात त्यात आणखी ३२७ ची भर पडली आहे. सध्या अधिग्रहित करण्यात आलेल्या ६९९ विहिरींपैकी २०० विहिरी या टँकर भरण्यासाठी अधिग्रहित केल्या गेल्या आहेत. जिल्हाटँकर औरंगाबाद१७७ जालना०७ नांदेड१७ बीड१२९ लातूर०५ उस्मानाबाद६० एकूण३९५