राजकोटमध्ये हॉस्पिटलला आग लागून पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू

By | Updated: November 28, 2020 04:10 IST2020-11-28T04:10:58+5:302020-11-28T04:10:58+5:30

.......... मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश : सुप्रीम कोर्टाने मागविला अहवाल अहमदाबाद : गुजरातच्या राजकोट शहरात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू ...

Five corona patients die in hospital fire in Rajkot | राजकोटमध्ये हॉस्पिटलला आग लागून पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू

राजकोटमध्ये हॉस्पिटलला आग लागून पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू

..........

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश : सुप्रीम कोर्टाने मागविला अहवाल

अहमदाबाद : गुजरातच्या राजकोट शहरात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये आग लागून पाच रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची दखल घेत गुजरात सरकारकडून अहवाल मागविला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त करीत चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी सांगितले की, या हॉस्पिटलमधील २६ रुग्णांना वाचविण्यात आले आहे. त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

आनंद बंगलो चौक भागात चार मजली उदय शिवानंद हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर आयसीयू वॉर्डात गुरुवारी रात्री उशिरा आग लागली. याठिकाणी ३१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होता. राजकोटचे पोलीस आयुक्त मनोज अग्रवाल यांनी सांगितले की, आग लागल्याने आयसीयूतील ११ पैकी पाच रुग्णांचा मृत्यू झाला. आग इतर मजल्यावर पसरण्याआधीच त्यावर नियंत्रण मिळविण्यात आले. अग्निशामक विभागाने अर्ध्या तासातच या आगीवर नियंत्रण मिळविले. तीन कोरोना रुग्णांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघांचा दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. पटेल यांनी सांगितले की, यात कोणीही जखमी झाले नाही. प्राथमिक चौकशीत असे दिसून आले आहे की, एका व्हेंटिलेटरमध्ये शॉर्टसर्किटने आग लागली. या खासगी हॉस्पिटलकडे अग्निशमन विभागाची एनओसी आहे, तसेच अग्निशमन उपकरणेही होती.

मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की, वरिष्ठ आयएएस अधिकारी ए.के. राकेश प्रकरणाची चौकशी करतील. ऑगस्टमध्ये अहमदाबादेतील चार मजली खासगी हॉस्पिटलला आग लागून कोरोनाच्या आठ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

सर्वोच्च न्यायालयात केंद्राकडून हजर असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, केंद्रीय गृहसचिव शनिवारपर्यंत बैठक घेतील आणि देशातील सरकारी हॉस्पिटलसाठी अग्निसुरक्षा निर्देश जारी करतील.

..........

Web Title: Five corona patients die in hospital fire in Rajkot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.