मानवी तस्करीच्या आरोपात दोन महिलांसह पाच अटकेत
By | Updated: November 28, 2020 04:11 IST2020-11-28T04:11:33+5:302020-11-28T04:11:33+5:30
राजनांदगाव (छत्तीसगढ) : मानवी तस्करीच्या आरोपात दोन महिलांसह पाच जणांना गजाआड करण्यात आले. पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की, डोंगरगड शहरात ...

मानवी तस्करीच्या आरोपात दोन महिलांसह पाच अटकेत
राजनांदगाव (छत्तीसगढ) : मानवी तस्करीच्या आरोपात दोन महिलांसह पाच जणांना गजाआड करण्यात आले.
पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की, डोंगरगड शहरात २३ वर्षीय महिलेचे अपहरण करून बलात्कार करण्याच्या तसेच तिची विक्री करण्याच्या आरोपात डोंगरगड येथील चार जण व रायपूर येथील एका महिलेला अटक केली आहे. यातील चार जणांना २३ नोव्हेंबर रोजी तर रायपूरमधील आरोपीस २५ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. आरोपींमधील एका महिला भाजपची कार्यकर्ती असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकारानंतर पक्षाने तिची हकालपट्टी केली आहे. प्रदेश भाजपने एका निवेदनात म्हटले आहे की, प्रदेशाध्यक्ष विष्णूदेव साय यांनी तिची प्राथमिक सदस्यता रद्द केली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलेच्या पतीने यावर्षी सप्टेंबरमध्ये आपली पत्नी व चार वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. याच कालावधीत २२ नोव्हेंबर रोजी ही महिला डोंगरगडमध्ये दाखल झाली व पोलीस ठाण्यात जाऊन तिने आपल्याबरोबर घडलेला प्रकार सांगितला. तिने सांगितले की, सकाळी फिरायला जाताना तिची ओळख एका महिलेशी झाली होती. तिने ११ सप्टेंबर रोजी मला पिण्याच्या पाण्यात गुंगीचे औषध टाकून दिले. त्यानंतर मी जागी झाले तेव्हा रायपूरस्थित स्वामी विवेकानंद विमानतळावर होते. माझ्याबरोबर माझा मुलगाही होता. त्यावेळी संबंधित महिलेबरोबर इतरही लोक होते. रात्री मला दिल्लीत आणले व मला मुलासह एका घरात ठेवले. या काळात एकाने माझ्यावर अत्याचार केला.
आरोपींनी नंतर मला हरियाणामध्ये नेले. तेथे माझी एकाला एक लाख रुपयांत विक्री केली. मी त्याच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न केला. परंतु पकडले गेले. त्यानंतर त्या व्यक्तीने मला महिलेच्या स्वाधीन केले, असे महिलेने सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, त्यानंतर आरोपींनी महिलेला हरियाणाच्या एकाला दीड लाख रुपयांना विकले. तिने त्याला या सर्व प्रकाराची माहिती दिली तेव्हा तोच तिला पोलीस ठाण्यात घेऊन गेला. त्यानंतर ही महिला हरियाणा पोलिसांच्या सहकार्याने २२ नोव्हेंबर रोजी डोंगरगड येथे पोहोचली. आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
या प्रकरणात पीडितेचा गुंगीचे औषध देणारी महिला मुख्य आरोपी आहे. दिल्ली व हरियाणामधील काही लोकांच्या ती संपर्कात असते. तसेच रायपूरमधील महिलाही दिल्ली-हरियाणातील लोकांच्या संपर्कात आहे, अशी माहिती समजली आहे. त्याबाबत तपास सुरू आहे. पोलिसांनी तपासासाठी विशेष पथके स्थापन केली आहेत. या प्रकरणात इतरही अनेक लोकांना अटक केली जाऊ शकते.