पहिला शब्द शपथेचा... पहिली घोषणा ‘पोल घ्या... पोल घ्या...’
By Admin | Updated: November 14, 2014 00:54 IST2014-11-14T00:30:43+5:302014-11-14T00:54:05+5:30
आमदार त्रिंबक भिसे , लातूर पहिल्यांदा निवडून येऊन आमदार झालेल्या माणसाला जे कुतूहल होते तेच मला विधानसभेचे होते. मी विधानभवनात आमदार म्हणून गेलो तेव्हा खुप आनंदी होतो.

पहिला शब्द शपथेचा... पहिली घोषणा ‘पोल घ्या... पोल घ्या...’
आमदार त्रिंबक भिसे , लातूर
पहिल्यांदा निवडून येऊन आमदार झालेल्या माणसाला जे कुतूहल होते तेच मला विधानसभेचे होते. मी विधानभवनात आमदार म्हणून गेलो तेव्हा खुप आनंदी होतो. थोडीशी धाकधूकही होती. पण वातावरण इतके हलकेफुलके होते की दडपणे गळून पडली. मी आमदार म्हणून उच्चारलेला पहिला शब्द शपथेचा आहे. कारण ती शपथ आमदार म्हणून देण्यात येत होती. तर माझी पहिली घोषणा ‘पोल घ्या.. पोल घ्या...’ ही.
अधिवेशनाच्या तारखा घोषित झाल्यावर मुंबईचे वेध होतेच. काही घरगुती कारणामुळे कुटुंबही सोबत घेतले. परंतु मंत्रालयातीलच कर्मचारी पंडीतराव सर्जे आणि रमेश पारीख हे खास माझ्यासोबत सहकारी आले. मी जिल्हा परिषदेला तीन टर्म सदस्य होतो. या आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतानाच्या काळात काँग्रेस कार्यकर्ता या नात्याने त्यांना भेटायला म्हणून याआधी विधानभवनात गेलो होतो. पण आमदार म्हणून पाऊल टाकताना आनंदच और होता. आमदार निवासात एका मतदारसंघातून यापूर्वी जो आमदार निवडून आला त्याच आमदाराचे निवासस्थान पुढच्याला देतात. त्यामुळे माझे मित्र वैजनाथराव शिंदे यांचेच निवासस्थान मला मिळाले.
दहा तारखेला सकाळी लवकर आवरुन मी विधानभवातील पक्ष कार्यालयात बैठकीला गेलो. तिथे मला माझ्या नावाची फाईल मिळाली. त्या फाईलमध्ये जी कागदपत्रे होती त्यात सर्व नवनिर्वाचित आमदारांची यादी, माझ्यासाठी जी खुर्ची होती तिचा क्रमांक आणि इतर नव्या आमदाराला उपयोगी ठरतील अशा माहितीची कागदे होती. कागदपत्रे घेऊन ज्या सभागृहासाठी मी निवडून आलो त्या विधानभवनात पहिल्यांदा पाऊल टाकले होते. यापूर्वी कधीच मी तिथे गॅलरीत बसायलाही गेलो नव्हतो. आत जाताच छाती भरुन आली. २८१ क्रमांकाची खुर्ची माझ्यासाठी रिझर्व्ह होती. त्यात जाऊन बसलो. माझ्या एका बाजूला आ. नितेश राणे आणि एका बाजूला आ. कुणाल पाटील होते. आ. यशोमती ठाकूर आणि आ. वर्षा गायकवाड पुढे मागे. सभागृहात १३० आमदार नवीन होते. त्यात आमच्या काँग्रेसचे ४२. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोकराव चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आदींच्या भेटी घेतल्या. मी लातूर ग्रामीणमधून निवडून आलोय हे कळल्यावर अनेकांनी विलासराव देशमुख यांची तीव्रतेने आठवण काढली. पहिल्या दिवशी गावीत यांची हंगामी सभापती आणि बाळासाहेब थोरात यांची हंगामी उपसभापती म्हणून निवड झाली होती. नव्या आमदारांचा शपथ देण्याचेच पहिल्या दिवशी कामकाज चालले. ११ ते २ हा संपूर्ण दिवस मी सभागृहात बसलो. आमदारांची शपथ झाली की सर्वजण टाळ्या वाजवून अभिनंदन करायचे. एकमेकांना प्रोत्साहन द्यायचे. दुपारी कामकाजानंतरच मी बाहेर आलो.
दुसऱ्या दिवशीही आमदारांचे शपथविधी झाले. मराठीतून ‘मी त्रिंबक भिसे ईश्वरास साक्ष ठेवून शपथ घेतो की’ म्हणत तत्कालीन उपसभापती बाळासाहेब थोरात यांच्याकडून आमदारकीची शपथ घेतली. खुप हरखून गेलो होतो. सर्व नव्या-जुन्या आमदारांना भेटण्याचा प्रयत्न केला. ओळखी करुन घेतल्या. सभागृह समजून घेण्याचा प्रयत्न केला. लॉबीत माझ्या नावाचे कपाट होते. त्यात फाईल ठेवली - काढली. मनापासून भाषणे ऐकली. आ. आर. आर. पाटील, आ. गणपतराव देशमुख यांची भाषणे खुप आवडली. सभागृहातील तिसरा दिवस हा गोंधळाचाच होता. सभापतींच्या निवडीनंतर अविश्वास दर्शक ठरावावरुन प्रचंड घोषणाबाजी झाली. यावेळी काँग्रेसचे सारे आमदार ‘पोल घ्या.. पोल घ्या..’ ही घोषणा देत होते. मी ही उठून त्यात सहभागी झालो आणि जोरात घोषणा दिल्या. हा दिवसच गोंधळाचा होता. तरीही सत्ताधाऱ्यांनी आवाजी मताने विश्वासदर्शक ठराव मंजूर केला. आमचे नेते सभापतींच्या दालनात जाऊन हरिभाऊ बागडे आणि मंत्री विनोद तावडे यांच्याकडे पोलची मागणी करीत होते त्यात मी सुध्दा सहभागी झालो. आमच्या नेत्यांसोबत आम्ही राज्यपाल यायच्या प्रवेशद्वारासमोर बसून निदर्शने केली.