आषाढी सोहळ्यासाठी पैठणहून निघणार प्रथमच दोन दिंड्या!
By Admin | Updated: June 12, 2017 00:30 IST2017-06-12T00:25:50+5:302017-06-12T00:30:56+5:30
पैठण : पंढरपूर आषाढी सोहळ्यासाठी पैठण येथून अखेर दोन दिंड्या निघणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आषाढी सोहळ्यासाठी पैठणहून निघणार प्रथमच दोन दिंड्या!
लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : पंढरपूर आषाढी सोहळ्यासाठी पैठण येथून अखेर दोन दिंड्या निघणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाथांची पालखी घेऊन जाण्याचे अधिकार दत्तकपुत्र रघुनाथ महाराज यांच्याकडे गेल्याने नाथवंशजांनी स्वतंत्र दिंडी काढण्याचा निर्णय घेतला आहे. पैठण येथून निघणाऱ्या दोन्ही दिंड्यांचे पैठण ते पंढरपूर असे भिन्न मार्ग असल्याने दिंडी सोहळ्यादरम्यान प्रशासनास दक्ष राहावे लागणार आहे.
आषाढी सोहळ्यात शेकडो वर्षांपासून नाथवंशज पंढरपूरकडे पायी दिंडीने जातात. ही परंपरा जोपासण्यासाठी आम्ही दिंडी घेऊन पंढरपूरकडे जाणार आहोत, असे नाथवंशज दिंडी सोहळा प्रमुख छय्या महाराज गोसावी यांनी स्पष्ट केले. पंढरपूरसाठी दिंडी घेऊन जाण्याचा अधिकार सर्वांना आहे. पंढरपूरच्या विठोबाशी नाथवंशजांचे अनेक पिढ्यांपासून नाते आहे. यामुळे आम्ही नाथवंशज दिंडी घेऊन जाणार आहोत.
आमच्या दिंडीत वारकरी सहभागी होतात. त्यांना आमच्या दिंडीत येऊ नका, असे आम्हाला म्हणता येणार नाही, असे छय्या महाराज यांनी सांगितले.
पैठण येथील गावातील नाथ मंदिरातून नाथसंस्थानची दिंडी निघाल्यानंतर नाथवंशजांची दिंडी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गावातील नाथ मंदिरातून समाधी मंदिरात जाण्यासाठी निघणार आहे. नाथ मंदिरातून पंढरपूरकडे दिंडी मार्गस्थ होणार असल्याचे छय्या महाराज गोसावी यांनी सांगितले.
वारकऱ्यांची द्विधा मन:स्थिती
पैठण येथून दोन दिंड्या पंढरपूरसाठी रवाना होणार आहेत. यामुळे नियमितपणे पालखीसोबत जाणाऱ्या वारकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. कोणत्या दिंडीत जावे, असा प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित झाला आहे. यामुळे कोणता झेंडा घेऊ हाती, अशी अवस्था वारकऱ्यांची झाली आहे.
दरम्यान, यंदा पावसाचे आगमन वेळेवर झाल्याने वारकरी आनंदी आहेत. त्यामुळे दिंडी सोहळा हर्षोल्हासाने साजरा होणार आहे. विठूरायाच्या दर्शनाची ओढ लागल्याने दरवर्षी हजारो वारकरी आषाढी एकादशीची वाट पाहत असतात. त्यामुळे दिंडीत उत्साह असतो.