जालन्यात पहिले राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:48 IST2017-08-06T23:48:25+5:302017-08-06T23:48:25+5:30
सीटूच्या वतीने जालन्यात पहिल्या श्रमिक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

जालन्यात पहिले राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलन
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्यावरील अन्याय दूर व्हावा, त्यांच्यासाठी निर्माण झालेल्या साहित्याद्वारे व्यापक विचार मंथन व्हावे या उद्देशाने सीटूच्या वतीने जालन्यात पहिल्या श्रमिक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. १० व ११ सप्टेंबर रोजी येथील शगुन मंगल कार्यालयात होणाºया या संमेलनात राज्यभरातील साहित्यिक, विचारवंत सहभागी होणार आहेत.
संमेलनाचे राज्य निमंत्रक राजीव देशपांडे, सुभाष थोरात, संयोजन समितीचे सचिव आण्णा सावंत, स्वागताध्यक्ष साईनाथ पवार यांनी रविवारी पत्रकार परिषदे संमेलनाची भूमिका व कार्यक्रमांची रुपरेषा याबाबत माहिती दिली.
१० सप्टेंबरला सकाळी साडेआठ वाजता नरसय्या आडाम यांच्या उपस्थितीत लोकशाही आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून ग्रंथ सन्मान मिरवणूक काढण्यात येणार आहे. दहा वाजता ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्याहस्ते संमेलनाचे उदघाटन होईल.
संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. आ.ह. साळुंखे यांच्यासह अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत डहाके, कादंबरीकार दिनानाथ मनोहर, लेखक महावीर जोंधळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत कला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य : सद्य स्थिती या विषयावर आयोजित परिसंवादात प्रा. जयदेव डोळे, सईद अहेमद यांच्यासह गणेश विसपुते, आसाराम लोमटे, प्रतिमा जोशी, श्रीरंजन आवटे, राजकुमार तांगडे, धम्म संगिनी यांचा सहभाग असेल.
सायंकाळी साडेपाच ते साडेआठ दरम्यान आकडा, आम्ही दोघं, परिवर्तनाचा जलसा हे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. रात्री साडेआठ वाजता साहित्यिक रेखा बैजल यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. ११ सप्टेंबरला सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत श्रमिकांचे मुक्ती लढे आणि मराठी साहित्य या विषयावर परिसंवाद होईल. यामध्ये कादंबरीकार कुमान अनिल, सीटूचे प्रा. सुभाष जाधव, अमृत मेश्राम, लेखक रवींद्र चावरेकर, शिल्पा कांबळे, प्रभू राजगडकर, श्रीधर पवार, डॉ. सुरेश वाघमारे, डॉ. अक्रम पठाण हे विचार मांडणार आहेत.
साडेअकरा ते दीड दरम्यान होणाºया तिसºया सत्रात ग्रामीण कष्टकरी आणि कला-साहित्य या विषावर समीक्षक डॉ. मनोहर जाधव, उद्धव भवलकर, सदानंद देशमुख, डॉ. के.जी.एनपुरे, डॉ. माधव गादेकर, राजाभाऊ भैलुमे, आनंद विंगकर सहभागी होणार आहेत. समारोप सत्रात श्रमिक संस्कृतीपुढील आव्हाने या विषयावर विचारमंथन होणार आहे.