जिल्ह्यात प्रथमच सर्वदूर पाऊस
By Admin | Updated: July 24, 2014 00:39 IST2014-07-24T00:25:13+5:302014-07-24T00:39:25+5:30
औरंगाबाद : पावसाळा सुरू झाल्यापासून प्रथमच गेल्या दोन महिन्यांत मंगळवार आणि बुधवार असे सलग दोन दिवस संपूर्ण जिल्ह्यात रिमझिम भीजपाऊस सुरू असल्याने शेतकरी सुखावला आहे.

जिल्ह्यात प्रथमच सर्वदूर पाऊस
औरंगाबाद : पावसाळा सुरू झाल्यापासून प्रथमच गेल्या दोन महिन्यांत मंगळवार आणि बुधवार असे सलग दोन दिवस संपूर्ण जिल्ह्यात रिमझिम भीजपाऊस सुरू असल्याने शेतकरी सुखावला आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी जलसाठ्यात वाढ झालेली नाही. यासाठी मोठ्या पावसाचीे गरज आहे. दरम्यान, रखडलेल्या पेरण्यांना वेग आला असून दोन दिवसांपासून सूर्यदर्शन झालेले नाही.
जिल्ह्यात फुलंब्री, सिल्लोड व सोयगाव तालुका वगळता इतर तालुक्यांकडे पावसाने पूर्णपणे पाठ फिरविली होती. मात्र आता या तालुक्यातही रिमझिम सुरू झाल्याने तेथे पेरणी सुरू झाली आहे.
बाजारसावंगीत दीड फुटापर्यंत ओल
बाजारसावंगी, सुलतानपूर परिसरात कापूस, मका, तूर पिकांना जीवदान मिळाले आहे. मंगळवारपासून सुरू झालेला पाऊस बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. सुमारे दीड फुटापर्यंत ओल गेल्याचा शेतकऱ्यांचा अंदाज आहे; मात्र दमदार पाऊस झाला नसल्याने नदी-नाल्यांना पूर गेला नाही.
वासडी परिसरात आनंदी आनंद
वासडी व परिसरात मागील आठवड्यात एक चांगला पाऊस पडल्यानंतर काही ठिकाणी पेरणी केली गेली, तर परिसरात बागायती क्षेत्र असल्यामुळे विहिरीच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी अद्रक, कपाशी, मका पिकांची लागवड केली होती; मात्र दोन दिवसांपासून भीजपाऊस पडत असल्याने आनंदी आनंद आहे.
करंजखेडमध्ये बोचरी थंडी
करंजखेड परिसरात २२ जुलै रोजी रात्री १0 वाजेपासून २३ जुलै सायंकाळी ७ वाजेपर्यंत संततधार सुरू असल्याने निंदणीसह कोळपणी मशागत कामे ठप्प झाली. पावसाबरोबर बोचरी थंडी जाणवत असल्यामुळे अनेक ग्रामस्थांनी घरात राहणेच पसंत केले. जनावरेही गोठ्यातच होती. पेरणी झालेल्या पिकांना हा पाऊस वरदान ठरला.
चितेगाव बाजारपेठेत शुकशुकाट
चितेगाव परिसरातील पांगरा, बाभूळगाव, पैठणखेडा, खंडेवाडी, नायगाव, बोकूडजळगाव, फारोळा, शिवनी, केसापुरी, जांभळी या भागात बुधवारी दिवसभर भीजपाऊस झाला. या सरींमुळे चितेगाव बाजारपेठेत शुकशुकाट होता.
वडोदबाजारात ११ तास वीज गुल
वडोदबाजार परिसरात बुधवारी पहाटे ३ वाजेदरम्यान पाऊस सुरू असतानाच हवेचे प्रमाण वाढल्याने अचानक वीज गुल झाली. दुपारी २ वाजता वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला. अद्याप शेतातून पावसाचे पाणी वाहून न निघाल्याने जोरदार पावसाची आवश्यकता आहे. संततधार सुरू असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे. समाधानकारक पाऊस पडत असला तरी पावसासोबत हवेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पाऊस कमी अन् हवा जास्त असे चित्र निर्माण झाले आहे.
पानवडोद, गोळेगावात ९० टक्के पेरणी
पानवडोद परिसरात ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून मका, कपाशी, सोयाबीन आदी पिकांची लागवड करण्यात आली आहे. वेळ निघून गेल्याने शेतकऱ्यांनी उडीद-मूग पेरण्याचे टाळले. गोळेगाव येथील मंडळ कार्यालयात बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ३० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
आळंद परिसरात व्यवहार ठप्प
आळंद परिसरात सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.या पावसामुळे पिकांना चांगलाच फायदा होणार असला तरी परिसरात अद्यापपर्यंत एकदाही जोरदार पाऊस पडला नसल्याने नदी-नाले, विहिरी, धरण कोरडेच आहेत. मोठ्या पावसाची सर्वच प्रतीक्षा आहे.
पैठण तालुक्यात पावसाचे स्वागत
पैठण, पाचोड, कडेठाण, आडूळ, विहामांडवा, टाकळी अंबड, कचनेर परिसरातही रिमझिम सुरू आहे. तालुक्यात प्रथमच पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी वरुणराजाचे जोरदार स्वागत केले. (वार्ताहरांकडून)
अब्दुलपूर तांडा शाळेचा व्हरांडा कोसळला
बाजारसावंगी : दोन दिवसांच्या भीजपावसामुळे मोडकळीस आलेल्या अब्दुलपूर तांडा येथील शाळेचा व्हरांडा कोसळला. सुदैवाने या वेळेत विद्यार्थ्यांची प्रार्थना सुरू असल्याने पुढील अनर्थ टळला. येथील शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत असून, दोन शिक्षक कार्यरत आहेत. येथील शाळा इमारतीसही मोठ्या प्रमाणात तडे गेलेले असल्याने विद्यार्थ्यांना व शिक्षकांना जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करावे लागत आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार बालाजी शेवाळे, केंद्रप्रमुख बी.टी. काळे, जे. जे. चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली. येथील इमारतीची दुरुस्ती न करता नवीन खोल्यांचे बांधकाम करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
फुलंब्रीसह तालुक्यात १४ तास संततधार
फुलंब्री तालुक्यात गेल्या १४ तासांपासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सूर्यदर्शन झाले नाही. मंगळवारी रात्री ११ वाजल्यापासून पावसाची रिपरिप सुरू झाली ती रात्रभर चालली, तसेच बुधवारी दिवसभर मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. पाण्याची साठवण झालेली नसली तरी पाणी जमिनीत मुरले, शेतातील पाणी बाहेर आले. पिके छोटी असली तरी या पावसाने मोठा दिलासा मिळाला. दिवसभर पडलेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला आहे. तालुक्यात ५९ मि.मी. पाऊस पडला. रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. पावसाची गती धीमी असल्याने तालुक्यातील सांजूळ, वाकोद व फुलंब्री मध्यम प्रकल्पाच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही.
कन्नड तालुक्यात जनजीवन विस्कळीत
कन्नड तालुक्यात मंगळवार रात्रीपासून सर्वदूर संततधार सुरू आहे. पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. शासकीय कार्यालयामधील कर्मचाऱ्यांची उपस्थितीही रोडावली होती. पावसाची संततधार असली तरी शेतकरी वर्गात मात्र समाधानाचे वातावरण आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. गेल्या २४ तासांत तालुक्यात सरासरी ११ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत महसूल मंडळनिहाय झालेला पाऊस व कंसात आतापर्यंत झालेला एकूण पाऊस पुढीलप्रमाणे - कन्नड १३ मि.मी. (१११ मि.मी.), चापानेर ८ मि.मी.(९४ मि.मी.), देवगाव ९ मि.मी.(२७० मि.मी.), चिकलठाण ५ मि.मी.(११३ मि.मी.), पिशोर १० मि.मी.(१११ मि.मी.), नाचनवेल १५ मि.मी.(११६ मि.मी.), करंजखेड २२ मि.मी.(१९५ मि.मी.), चिंचोली ६ मि.मी.(६३ मि.मी.).
बाबरा येथे आठवडी बाजारावर परिणाम
बाबरा परिसरात पावसामुळे बुधवारच्या आठवडी बाजारावर परिणाम झाल्याचे दिसून आले. बाहेरून आठवडी बाजारासाठी येणारे व्यापारी तर आलेच नाहीत; परंतु ग्राहकही या बाजाराकडे फिरकले नाहीत, त्यामुळे गावातील थोडेफार व्यापारी आपली दुकाने घेऊन बसले होते; परंतु ग्राहकी नसल्याने व दिवसभर पावसाच्या रिपरिपमुळे त्यांचाही हिरमोड झाला. पिकांसाठी हा पाऊस योग्य मानला जात असला तरी नदी, नाले, जलसाठे अद्यापही कोरडेठाकच आहेत.