संघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप
By Admin | Updated: September 3, 2014 00:05 IST2014-09-03T00:05:35+5:302014-09-03T00:05:35+5:30
औरंगाबाद : आ. पंकजा पालवे यांनी २८ आॅगस्टपासून सिंदखेडराजा येथून संघर्ष यात्रेला सुरुवात केली

संघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप
औरंगाबाद : आ. पंकजा पालवे यांनी २८ आॅगस्टपासून सिंदखेडराजा येथून संघर्ष यात्रेला सुरुवात केली असून, आज केंद्रीय मानवसंसाधनमंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत औरंगाबादेत यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप करण्यात आला.
जयभवानीनगर येथील चौकात आयोजित जाहीर सभेस भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, प्रदेश सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर, उपमहापौर संजय जोशी, शहराध्यक्ष बापू घडामोडे, माजी महापौर भागवत कराड, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, माजी मंत्री हरिभाऊ बागडे, शिरीष बोराळकर, संजय केणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सभेला संबोधित करताना पंकजा पालवे म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवाला अग्नी देतानाच मी शपथ घेतली होती, या राज्याला आणि देशाला तुमचे नाव विसरू देणार नाही. त्यांचा राजकीय वारसा पुढे नेण्यात कुठेच कमीही पडणार नाही. साहेब नाहीत म्हणून रडत बसण्यापेक्षा मी लढणार आहे. भाजपाला महाराष्ट्रात टॉनिक देण्याचे काम करणार असून, वैभवशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी संघर्ष यात्रेला सुरुवात केली आहे.
केंद्रीय मानवसंसाधनमंत्री स्मृती इराणी यांनी आपल्या भाषणात राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. पितृतुल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या प्रेरणेमुळेच मी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केल्याचे मान्य केले. पंकजा पालवे यांनी कोणत्याही निवडणुका नसताना ‘बेटी बचाव’अभियान राबविले. आता गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी संघर्ष यात्रा सुरू केली आहे. आज यात्रेच्या
पहिल्या टप्प्याचा हा समारोप नसून, विजयाची सुरुवात असल्याचे त्यांनी नमूद केले.
तत्पूर्वी प्रदेश सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर यांनी यात्रेला मिळत असलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल माहिती दिली. बापू घडामोडे यांनी प्रास्ताविक केले. सभेचे सूत्रसंचालन हेमंत खेडकर यांनी केले, तर आभार विजयराज साळवे यांनी मानले. यावेळी प्रवीण घुगे, अतुल सावे, नारायण कुचे, नगरसेवक बालाजी मुंडे, संजय चौधरी, अनिल मकरिये आदींची उपस्थिती होती.
सभेच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी एका उघड्या जीपमध्ये पंकजा पालवे यांची मोटारसायकल रॅलीही काढण्यात आली. मुकुंदवाडी,
जालना रोड, गजानन महाराज मंदिर मार्गे रॅली जयभवानीनगर येथे पोहोचली. यावेळी तरुणाईने मोठी गर्दी केली होती.