पहिले पाढे पंचावन्न
By Admin | Updated: September 12, 2014 00:05 IST2014-09-12T00:03:10+5:302014-09-12T00:05:15+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील पाच ठिकाणी असलेली कृषी चिकित्सालयाची जमीन निव्वळ देखभाल व दुरूस्तीअभावी पडीक होत चालली आहे.

पहिले पाढे पंचावन्न
हिंगोली : जिल्ह्यातील पाच ठिकाणी असलेली कृषी चिकित्सालयाची जमीन निव्वळ देखभाल व दुरूस्तीअभावी पडीक होत चालली आहे. अधिकाऱ्यांच्या डोळेझाकपणामुळे काही ठिकाणी ती गिळंकृत करण्याचाही अनेकांनी प्रयत्न चालविला. त्यातच पिकांना तणाने वेढा दिला असताना अळीनेही पानाची चाळणी केली. गत अनुभव पाहाता यंदाही परिस्थिती बदलली नसल्याने ‘पहिले पाढे पंचावन्न’ म्हणायची वेळ आली आहे.
गतवर्षी ३०० एकरात २८६ क्विंटल उत्पादनाची नामुष्की कृषी विभागावर ओढवली. त्याचा धडा कृषी विभागाने घेतलेला नाही. कोणत्याही जमिनीवर सोयाबीन वगळत इतर पिकांची पेरणी केलेली नाही. नवीन पिकांची पेरणी, प्रयोग, प्रात्यक्षिके कोसोमैल दूर आहेत. एकदा पेरून काढणीलाच अधिकारी त्या जमिनीवर जातात. दरम्यान कुंपनच शेत खात असल्याने यंदाही दुरवस्था कायम राहण्याची शक्यता आहे. आजघडीला पिकांना तणाने वेढा दिला. कोळपणी, निंदणीच्या नावाने बोंबाबोंब असल्याने पिकांबरोबर तण वाढले. त्यावरही अळीने हल्ला केल्याने पानाची चाळणी झाली. इतरांना फवारणीवर फवारणी करण्याचा सल्ला देणाऱ्या विभागाला फवारणीचे शहाणपण सुचले नाही. आहे ते पिकही मोकाट जनावरांसाठी नंदनवन ठरत आहे. हिंगोलीतील सर्व जनावरे चाऱ्यासाठी भटकंती करण्याची गरज नाही. हे ओळखूनही शहरातील काही लोकांनी जाणूनबूजून जनावरे मोकाट सोडली आहेत.
इतर ठिकाणीही तीच अवस्था असल्याचे पहावयास मिळते. कित्येक वर्षांपासून साधे कुंपनही विभागाला घालता आलेले नाही. दरवर्षी कोट्यावधी रूपये इतर योजनांसाठी खर्च होत असताना कायमस्वरूपी जमिनीसाठी कोणत्याही प्रकारचे संरक्षण केलेले नाही. सर्वच जमिनीला कोणीही वाली नसल्यासारखी अवस्था झाल्याने दुरवस्था कायम आहे. अधिकाऱ्यांनी डोळेझाक केल्यामुळे या जमिनीला कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (समाप्त)