नगरपंचायतींचा पहिला दिवस प्रशासकाविना !

By Admin | Updated: March 18, 2015 00:19 IST2015-03-18T00:12:45+5:302015-03-18T00:19:58+5:30

लातूर : लातूर जिल्ह्यातील जळकोट, देवणी, चाकूर आणि शिरुर अनंतपाळ ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आहे़

First day of municipal council administrators! | नगरपंचायतींचा पहिला दिवस प्रशासकाविना !

नगरपंचायतींचा पहिला दिवस प्रशासकाविना !


लातूर : लातूर जिल्ह्यातील जळकोट, देवणी, चाकूर आणि शिरुर अनंतपाळ ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आहे़ त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारीच संबंधित तहसीलदारांना नगरपंचायतीचा प्रशासक म्हणून पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले होते़ मात्र मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदारांची बैठक असल्यामुळे जिल्ह्यातील या चारही नगरपंचायतींचा पहिला दिवस प्रशासकाविनाच गेला़
राज्य शासनाकडून आदेश आल्यानंतर जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी तातडीने जळकोटचे तहसीलदार अविनाश कांबळे, शिरुर अनंतपाळचे तहसीलदार वसंत पवार, चाकूरचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, देवणीचे तहसीलदार अहिल्या गाटाळ यांना नगरपंचायतीचे प्रशासक म्हणून नियुक्त केले़ सोमवारीच आदेश या तहसीलदारांना पारित झाले़ मात्र मंगळवारी यापैकी एकाही तहसीलदारांनी आपल्याला नियुक्त केलेल्या नगरपंचायतीचा प्रशासक म्हणून पदभार घेतला नाही़ लातूरला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक असल्यामुळे पदभार घेणे शक्य झाले नाही़ लातूरहून आल्यानंतर पदभार घेतला जाईल, असे या तहसीलदारांनी सांगितले़ परिणामी, जळकोट, देवणी, चाकूर, शिरुर अनंतपाळ या नवनियुक्त नगरपंचायती पहिल्याच दिवशी प्रशासकाविना राहिल्या़ दररोजचा सरपंच आणि ग्रामसेवकांचा वावर राहिलेल्या या चारही ठिकाणच्या वास्तूमध्ये आज तेही आले नव्हते, असे तेथील ग्रामस्थांनी सांगितले़ शिवाय, तहसीलदारांनीही निवडणुकीसंदर्भात बैठक असल्याने प्रशासक म्हणून पदभार घेतला नाही. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील जळकोट, देवणी, चाकूर, शिरुर अनंतपाळ या ग्रामपंचायतींना स्वत:च्या शेष फंडाबरोबर ग्रामविकास खात्याकडून विकास निधी मिळत होता़ आता नगर पंचायती झाल्यामुळे नगर विकास खात्याकडून विकास निधी मिळणार आहे़ यामुळे या चारही शहरांचा विकास होईल, अशी अपेक्षा शहरवासीयांना आहे़ जिल्हाधिकाऱ्यांनी सध्या या चारही नव्या नगरपंचायतींवर प्रशासक म्हणून तहसीलदारांच्या नियुक्त्या केल्या आहेत़ सध्या शासनाकडून दुसरे आदेश नसल्यामुळे फक्त प्रशासक म्हणूनच नियुक्त्या दिल्या आहेत़ आता यानंतर वॉर्ड रचना, होऊन निवडणूक प्रक्रिया होईल़ लोकसंख्येच्या प्रमाणात आकृतीबंधानुसार मनुष्यबळाचीही नियुक्ती नगरपंचायतींमध्ये होणार आहे़ मात्र त्यापूर्वी वॉर्ड रचना करुन निवडणुकीचा कार्यक्रम शासनाकडून जाहीर होईल़ लोकनियुक्त पदाधिकारी नगरपंचायतीवर आल्यानंतर नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी या नगरपंचायतींचा कारभार पाहतील़ पूर्वी ग्रामविकास खात्याचा निधीवर विकासकामे करण्यास अडचण येत होती़ आता नगर विकास खात्याचा निधी येईल़ हा निधी ग्राम विकास खात्यापेक्षा अधिकचा असल्यामुळे विकासाला गती येईल, असे जाणकरांचे मत आहे़
जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायतीवर प्रशासक म्हणून तहसीलदारांना नियुक्त केले आहे़ मात्र नगरपंचायत म्हणून जाहीर झालेल्या चाकूर, देवणी, जळकोट व शिरुर अनंतपाळ ग्रामपंचायतीची मुदत अद्याप संपलेली नाही़ परिणामी, मुदतीच्या आतच ग्रामपंचायतींचा सरपंचपदाचा पदभार सोडून देण्याची वेळ सरपंचावर आली आहे़ चाकूर ग्रामपंचायतची मुदत १८ नोव्हेंबर २०१७ ला संपणार आहे़ तर देवणी ग्रामपंचायतीची मुदत १५ जुलै २०१५, जळकोट १९ जुलै २०१५ आणि शिरुर अनंतपाळ ४ नोव्हेंबर २०१६ ला संपणार आहे़ चाकूर ग्रामपंचायतीच्या मुदतीला सव्वा दोन वर्षांचा अवकाश होता तर शिरुर अनंतपाळ ग्रामपंचायतीला एक वर्षाचा अवकाश आहे़ देवणी व जळकोट ग्रामपंचायतीची मुदत चार महिन्यात संपणार होती़ मात्र आता नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यामुळे जुने सरपंच व ग्रा़पं़ सदस्य नगरपंचायतीचे लोकप्रतिनिधी म्हणून राहणार नाहीत़

Web Title: First day of municipal council administrators!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.