जीएसटीचा पहिला दिवस संभ्रमाचा

By Admin | Updated: July 2, 2017 00:44 IST2017-07-02T00:42:14+5:302017-07-02T00:44:10+5:30

औरंगाबाद : केंद्रीय जीएसटी व राज्य जीएसटी विभागात शनिवारी नवीन करप्रणालीचे जोरदार स्वागत करण्यात आले.

The first day of GST confusion | जीएसटीचा पहिला दिवस संभ्रमाचा

जीएसटीचा पहिला दिवस संभ्रमाचा

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : केंद्रीय जीएसटी व राज्य जीएसटी विभागात शनिवारी नवीन करप्रणालीचे जोरदार स्वागत करण्यात आले. प्रत्यक्षात ज्यांना या जीएसटीची अंमलबजावणी करायची त्या व्यापारीवर्गाचा दिवस संभ्रमात गेला. नवीन कराच्या अंमलबजावणीच्या पहिल्या दिवशी कोणी आपल्याकडील वस्तू जीएसटी लावून विकल्या, तर ग्राहक परत जाऊ नये म्हणून काही व्यापाऱ्यांनी जुन्या किमतीतच वस्तू विकल्या.
एक देश एक करप्रणाली ही व्यापारी वर्गाची जुनीच मागणी होती. मात्र, या करप्रणालीत काही जाचक अटींमुळे व्यापारी वर्गात थोडे निराशेचे वातावरण दिसून आले. मात्र, जिल्हा व्यापारी महासंघाने जीएसटीचे स्वागत केले. अडचणी सोडविण्यासाठी राज्य जीएसटी सहआयुक्त कार्यालयात स्वतंत्र मदत केंद्र सुरूकरण्यात यावे, अशी मागणी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. दुसरीकडे आज शनिवार असल्याने शहरातील कपडा बाजार, भांडीबाजार, सराफा बाजारातील दुकानांना साप्ताहिक सुटी होती. यामुळे या दुकाना उघडल्या नाहीत. इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानांमध्ये तुरळक ग्राहकी दिसून आली. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर २८ टक्के जीएसटी लागला आहे. जीएसटी लागू होण्याआधी २६.५ टक्के कर होता. दीड टक्क्यांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती वाढल्या. काहींनी जीएसटी लावून टीव्ही व अन्य वस्तू विक्री केल्या, तर काही व्यापाऱ्यांनी दुकानात आलेला ग्राहक खाली हात जाऊ नये, यासाठी जीएसटी लावला पण आपला नफा कमी करून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्री केल्या.
किराणा बाजारात मात्र संभ्रमावस्था दिसून आली. ज्या पॅकिंगमधील किराणा आहेत त्या जुन्या दरात विक्री करायचा की जीएसटी लावून विकायचा हाच संभ्रम व्यापाऱ्यांमध्ये दिसून आला. यामुळे काहींनी वाढीव कर लावून तर काहींनी जुन्या दरात पॅकिंगमधील किराणा विकला. शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकले कसे गोंधळून जातात तशीच काहीशी अवस्था व्यापाऱ्यांची झाली होती. मोंढ्यातील व्यापारी एकमेकांवर लक्ष ठेवून होते.
कोण कोण जीएसटी लावून विकतो हे पाहत होते, तर ज्यांनी जीएसटीमध्ये नोंदणी केली ते व्यापारी जीएसटीसह बिल तयार करताना दिसून आले. अजून असे अनेक व्यापारी आहेत ज्यांनी जीएसटीमध्ये नोंदणीच केली नाही, असे व्यापारी सम व्यावसायिकांशी तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सल्लामसलत करताना दिसून आले.

Web Title: The first day of GST confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.