जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या विरोधाचा पहिला दिवस मौनाचा
By Admin | Updated: March 22, 2017 00:18 IST2017-03-22T00:14:39+5:302017-03-22T00:18:31+5:30
लातूर जिल्हा परिषद स्थापनेपासून सत्तेवर असलेल्या काँग्रेसचा पहिला दिवस तसा मौनाचाच ठरला

जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या विरोधाचा पहिला दिवस मौनाचा
आशपाक पठाण लातूर
जिल्हा परिषद स्थापनेपासून सत्तेवर असलेल्या काँग्रेसचा पहिला दिवस तसा मौनाचाच ठरला. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उमेदवारही दिला नाही. त्यामुळे भाजपाचे पदाधिकारी बिनविरोध आले. सभागृहात उशिरा आलेल्या काँग्रेस सदस्यांकडे ना प्रशासनाचे लक्ष गेले, ना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे. सभागृहात प्रवेश करताना काँग्रेस सदस्यांनी स्वत:हून नागरिकांना रस्ता सोडण्याची विनंती केली.
जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच बहुमतात आलेल्या भाजपाचा सत्ता स्थापनेचा आनंद ओसंडून वाहत होता. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीने परिसर गजबजून गेला होता. सभागृहाच्या प्रवेशद्वारात कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती. पोलीस आणि जिल्हा परिषदेतील काही कर्मचारीही उभे होते. येणाऱ्या सदस्यांना सभागृहात सोडण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी भाजपाचे सदस्य सभागृहात जाताच इतरांकडे मात्र दुर्लक्ष केले.
दुपारी २.५४ वाजता काँग्रेसचे सदस्य धीरज देशमुख, धनंजय देशमुख, सोनाली थोरमोटे आदीजण सभागृहात येत असताना प्रवेशद्वारात गर्दीत अडकले. जिल्हा परिषद स्थापनेपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसला पहिल्याच दिवशी आलेला अनुभव जिव्हारी लागणारा आहे. ३.०५ वाजता आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य दिलीप नाडे, मंचकराव पाटील आदींनाही स्वत:हून सभागृहात मार्ग काढीत जावे लागले.