आधी सर्व्हिस प्रोव्हायडर, नंतर होणार औरंगाबादसाठी बस खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:09 IST2018-02-09T00:09:53+5:302018-02-09T00:09:59+5:30
स्मार्ट सिटीतील उपक्रमांतर्गत बस खरेदी करण्यापूर्वी सर्व्हिस प्रोव्हायडर नेमणार असल्याचे आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी गुरुवारी सांगितले. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आधी सर्व्हिस प्रोव्हायडर, नंतर होणार औरंगाबादसाठी बस खरेदी
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : स्मार्ट सिटीतील उपक्रमांतर्गत बस खरेदी करण्यापूर्वी सर्व्हिस प्रोव्हायडर नेमणार असल्याचे आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी गुरुवारी सांगितले. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आयुक्तांनी सांगितले की, बस खरेदी करण्यापूर्वी बस चालविण्याचे नियोजन होणे आवश्यक आहे. त्यासाठी आधी सर्व्हिस प्रोव्हायडर नेमला जाईल. याची निविदा प्रक्रिया येत्या पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर बस खरेदीसाठी निविदा मागविल्या जातील. शहरात प्रवासी वाहतुकीच्या बाबत निर्णय घेण्यासाठी पोलीस आयुक्त, आरटीओ अधिकारी, पालिका आयुक्त व महापौर यांची उपसमिती नेमली आहे. ही समिती प्रवास दर नियंत्रण, बसथांबे, वाहनतळासंबंधीच्या सर्व बाबींचा धोरणात्मक निर्णय घेईल. त्यानुसार सर्व्हिस प्रोव्हायडर ठरविला जाईल. स्मार्ट सिटीसाठी नेमलेल्या औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा राज्याच्या उद्योग खात्याचे प्रधान सचिव सुनील पोरवाल यांनी ५० साध्या बस खरेदीला मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत मंजुरी दिली आहे. पाच इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यालाही गेल्यावर्षी संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांनी मंजुरी दिली होती; परंतु इलेक्ट्रिक बस खरेदीत शासन सबसिडी मिळणार नाही. त्यामुळे साध्या बस खरेदी करण्याचे आदेश पोरवाल यांनी दिले.