- ज्ञानेश्वर भालेछत्रपती संभाजीनगर : इज्तेमा म्हणजे केवळ मुस्लिम समाजाचा धार्मिक कार्यक्रम, असे रूढ समीकरण समाजात प्रचलित आहे. मात्र, टाकळी राजेराय (ता. खुलताबाद) येथे ५ ते ६ जानेवारीदरम्यान झालेल्या इज्तेमाने या संकुचित चौकटीला छेद दिला. जाती–पाती, धर्म आणि परंपरांच्या भिंती ओलांडत या सामाजिक उपक्रमाने माणुसकी, सेवा आणि एकोप्याचा संदेश जनमानसांत उभा केला. सर्वधर्मीय नागरिकांचा सहभाग व सामूहिक श्रमदानातून सामाजिक सलोख्याची वाट निर्माण करत टाकळीतील या इज्तेमाने केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविले. विशेष म्हणजे इस्तेमाच्या दोन दिवसांपूर्वी टाकळीसह तालुक्यातील जवळपास सर्व गावांतील हिंदू बांधवांना बोलावून मुस्लिम बांधवांनी गावपंगत दिली होती. त्यानंतर इज्तेमाच्या तयारीस प्रारंभ करण्यात आला होता.
टाकळीत २६ एकरात झालेल्या या इज्तेमामध्ये जवळपास १२ हजारांपेक्षा अधिक भाविक आले होते. इज्तेमा परिसरात शिस्तबद्ध व्यवस्था, स्वच्छता, वाहतूक नियोजन, भाविकांच्या मार्गदर्शनासाठी शेकडो स्वयंसेवक कार्यरत होते. कोणताही दिखावा न करता, सर्वसामान्य नागरिकांनी आपल्यापरीने आर्थिक मदत देत या धार्मिक उपक्रमाला हातभार लावला. या दोन दिवसीय तालुकास्तरावरील इज्तेमात विविध जाती-धर्मांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी एकत्र येत “धर्म माणुसकीचा” हा संदेश अधोरेखित केला.
इज्तेमाच्या काळात भाविकांसाठी अन्नछत्र, श्रमदान, चहापाणी व्यवस्था आणि औषधोपचार कक्ष उभारण्यात आले होते. इज्तेमादरम्यान धर्मोपदेश, सामाजिक एकोपा, नैतिक मूल्ये, शांतता आणि बंधुता यावर भर देण्यात आला. धार्मिक विचारांसोबतच समाजातील तणाव दूर करून प्रेम, सहकार्य आणि परस्पर आदर वाढविण्याचे आवाहन करण्यात आले. टाकळी राजेराय येथील हा इस्तेमा धार्मिक कार्यक्रमासोबत सामाजिक ऐक्याचे आदर्श उदाहरण ठरल्याचे पुढे आले आहे.
हिंदू–मुस्लिम सद्भावनेचा प्रेरणादायी आदर्शइस्तेमापूर्वी याबाबत जनजागृती व सामाजिक ऐक्यासाठी २ जानेवारीला टाकळी गावातील मुस्लिमबांधवांनी खुलताबाद तालुक्यातील ३५ ते ४० गावांतील जवळपास ५०० हिंदूधर्मियांसाठी सामूहिक जेवणाचा कार्यक्रम घेतला होता. “धर्म वेगळे असले तरी माणुसकी एकच” हा संदेश या सामूहिक जेवणातून समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
सामाजिक भावनेला मान देत मांसाहार पूर्णतः बंदजनभावनेचा विचार करत या इज्तेमामध्ये धार्मिक सलोखा, सामाजिक बांधीलकीला प्राधान्य देण्यात आले. इज्तेमाच्या काळात नवीन वर्षांतील पहिलीच अंगारिका संकष्ट चतुर्थी असल्याने यादरम्यान मांसाहार पूर्णतः बंद ठेवण्यात आला होता. सर्व समाजघटकांनी या निर्णयाचे स्वागत करत संयम व श्रद्धेचे उदाहरण घालून दिले.
अशी होती इस्तेमाची दिनचर्याया दोनदिवसीय धार्मिक इज्तेमाची सोमवारी (दि.५) सकाळी फजरच्या नमाजपासून सुरुवात झाली. फजर नमाजनंतर हदीस विषयावर मार्गदर्शन व हदीस शरीफचे वाचन, दुपारी जोहरच्या नमाजनंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सायंकाळी पाचला असरच्या नमाजनंतर जिक्र विषयावर तर मगरीबच्या नमाजानंतर इस्लाम धर्म व दैनंदिन जीवनातील आचरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मंगळवारी फजर व जोहरच्या नमाजनंतर धार्मिक प्रवचने झाली. रात्री मगरीब आणि इशाच्या नमाजनंतर सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी मौलाना हसन नदवी पुनावाले यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक दुआ करून इज्तेमाची सांगता झाली.
Web Summary : Takli Rajerai's Iztema broke barriers, fostering unity. Villagers hosted a pre-Iztema feast for Hindus. The event emphasized community service, goodwill, and interfaith harmony, even observing a vegetarian day for a Hindu festival. It was a model of social cohesion.
Web Summary : टाकली राजेराय के इज्तेमा ने बाधाएँ तोड़कर एकता को बढ़ावा दिया। ग्रामीणों ने हिंदुओं के लिए इज्तेमा-पूर्व भोज का आयोजन किया। कार्यक्रम में सामुदायिक सेवा, सद्भावना और अंतरधार्मिक सद्भाव पर जोर दिया गया, यहाँ तक कि एक हिंदू त्योहार के लिए शाकाहारी दिवस भी मनाया गया। यह सामाजिक सामंजस्य का एक मॉडल था।