फेरीवाल्याचा मुलगा इंग्रजी माध्यमातून बिलोली तालुक्यात प्रथम
By Admin | Updated: June 19, 2014 00:19 IST2014-06-18T23:53:47+5:302014-06-19T00:19:13+5:30
राजेश गंगमवार, बिलोली कुंडलवाडी येथील खाटीक व्यावसायिकाने खेड्यापाड्यात सायकलवर फिरून मांसविक्री करीत मुलास इंग्रजी शाळेत टाकले़ हाच सचिन आदमनकर ९४ टक्के गुण घेवून तालुक्यात पहिला आला़
फेरीवाल्याचा मुलगा इंग्रजी माध्यमातून बिलोली तालुक्यात प्रथम
राजेश गंगमवार, बिलोली
कुंडलवाडी येथील खाटीक व्यावसायिकाने खेड्यापाड्यात सायकलवर फिरून मांसविक्री करीत मुलास इंग्रजी शाळेत टाकले़ हाच सचिन आदमनकर ९४ टक्के गुण घेवून तालुक्यात पहिला आला़
दररोज भल्या सकाळी उदरनिर्वाह करण्यासाठी जाणारे वडील़़़ घरातील जेमतेम परिस्थिती़़़ दररोजच्या व्यवसायावरच सायंकाळची चूल पेटवणाऱ्या छोट्या कुटुंबात आता महागडे इंग्रजी भाषेचे शिक्षण घेणे कितपत सोपे, परंतु परिस्थितीवर मात करीत कष्टाने सामोरे जाण्याची जिद्द ज्या पालकात असते त्यास हिमालयावर जाणेही अवघड नाही़ असाच प्रत्यय दहावीच्या निकालात दिसून आला.
खाटीक समाजाचा मांसविक्रीचा परंपरागत व्यवसाय आहे़ याच अनुषंगाने कुंडलवाडी येथील श्यामराव आदमनकर यांनी आपल्या मुलास प्रारंभीपासूनच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकले़ कुंडलवाडी ते बिलोली असा दररोजचा प्रवास़ त्याचप्रमाणे घरची जेमतेम, हलाखीची परिस्थिती, परिसर व घरात शैक्षणिक वातावरणाचा अभाव पण गरिबी सर्व काही शिकवते याच अनुषंगाने सचिनने बिलोलीच्या लिटल फ्लॉवर इंग्रजी शाळेत शिक्षण पूर्ण केले़ इंग्रजी शाळेत बड्या घरची मुले असतात, असा अनुभव आहे़ पण दारिद्र्याच्या चिखलातही कमळ उगवते असा प्रत्यय सचिनने मिळवलेल्या गुणावरून आला़ शाळेचा निकाल शंभर टक्के लागला, ज्यात सचिन ९४ टक्के गुण घेवून बिलोली तालुक्यात इंग्रजी माध्यमात पहिला आला़
नियमित अभयास, शिकण्याची जिद्द, इंग्रजीची गोडी यामुळे यश मिळाल्याचे सांगून भविष्यात प्रशासकीय सेवेत जावून समाजाची सेवा करण्याचा मानस त्याने बोलून दाखवला़ घरात मराठी, तेलगू, हिंदी अशा तीन-तीन भाषांचा सहवास असूनही इंग्रजी विषयात यश संपादन केले हे कौतुकच म्हणावे लागेल़ त्याच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष के़सुब्बाराव, मुख्याध्यापिका के़रजणी राणी, कुंडलवाडीचे नगराध्यक्ष डॉ़सायन्ना शेंगुलवार, जि़प़ सदस्य लक्ष्मण ठक्करवाड आदींनी कौतुक केले़ तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात या गरीब विद्यार्थ्याची प्रशंसा होत आहे़