फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण

By Admin | Updated: May 17, 2014 01:12 IST2014-05-17T01:08:14+5:302014-05-17T01:12:39+5:30

औरंगाबाद : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांची विजयाकडे घोडदौड सुरू असल्याचे दिसताच जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली

Fireworks fireworks, gully extract | फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण

फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण

 औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होताच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांची विजयाकडे घोडदौड सुरू असल्याचे दिसताच सकाळपासूनच महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली. हा जल्लोष शुक्रवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत सुरू होता. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची शुक्रवारी मतमोजणी करण्यात आली. विविध ठिकाणचे निकाल पाहण्यासाठी औरंगाबाद शहरातील नागरिक सकाळपासूनच टी.व्ही.समोर बसले होते. सकाळी १० वाजेच्या सुमारास महाराष्ट्र आणि देशातील विविध मतदारसंघांतील मतमोजणीच्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली. देशातील प्रमुख लढतीकडे मतदारांचे लक्ष लागले होते. जसजसे निकाल जाहीर होऊ लागले तसतसे शिवसेना, भाजपा, रिपाइं युतीच्या पदाधिकार्‍यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. पुंडलिकनगर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. गुलमंडी आणि मछली खडक, वसंत भवन येथेही उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. भाजपा कार्यकर्ते प्रचंड उत्साहात दिसत होते. पक्षाचा झेंडा घेऊन कार्यकर्ते ‘हर, हर मोदी’, ‘अब की बार मोदी सरकार’ अशा घोषणा देत होते. औरंगपुरा येथील नगरसेवक अनिल मकरिये यांच्या कार्यालयासमोरही फटाके फोडून आणि लाडू वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला. निराला बाजार येथील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात सकाळपासून पदाधिकारी ये-जा करीत होते. खैरे यांनी आघाडी घेतल्याचे कळताच कार्यालयातील पदाधिकारी आनंद व्यक्त करीत होते. बंजारा कॉलनीच्या चौकात माजी नगरसेवक संजीव रिडलॉन यांनी ढोल-ताशांसह जल्लोष केला. पेंडॉलमध्ये बघितला निकाल पुंडलिकनगर रोडवरील भाजपाच्या संपर्क कार्यालयासमोर पेंडॉल उभारला होता. पेंडॉलमध्ये मोठा टी.व्ही. लावण्यात आला होता. भाजपाचे पदाधिकारी आणि नागरिकांनी निकाल पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. भाजपा आणि मित्रपक्षांचे उमेदवार आघाडी घेत असल्याने उपस्थित जल्लोष करीत होते. गुजरातमधील बडोदा मतदारसंघातून मोदी विजयी झाल्याची बातमी टीव्हीवर दिसताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.

Web Title: Fireworks fireworks, gully extract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.