अग्निशमन अधिकारी निलंबनातच निवृत्त
By Admin | Updated: July 1, 2017 00:49 IST2017-07-01T00:44:33+5:302017-07-01T00:49:09+5:30
औरंगाबाद : अतिक्रमण हटाव पथक, घनकचरा, अग्निशमन आदी विभागांचा ‘समर्थ’पणे कामकाज पाहणारे महापालिकेतील मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन अखेर शुक्रवारी निलंबन काळातच निवृत्त झाले

अग्निशमन अधिकारी निलंबनातच निवृत्त
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अतिक्रमण हटाव पथक, घनकचरा, अग्निशमन आदी विभागांचा ‘समर्थ’पणे कामकाज पाहणारे महापालिकेतील मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन अखेर शुक्रवारी निलंबन काळातच निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी रुजू होण्यासाठी त्यांनी सर्व प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. शुक्रवारी महापालिकेतील आणखी २१ कर्मचारी निवृत्त झाले.
मागील वर्षी दिवाळीत जि. प. मैदानावर फटाक्यांच्या दुकानांना आग लागल्यानंतर तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी झनझन यांना निलंबित केले होते. त्यापूर्वी त्यांनी आपले वय कमी असून, पाच वर्षे आणखी वाढवून द्यावेत म्हणूनही खंडपीठापर्यंत धाव घेतली होती.
मागील एक वर्षापासून ते परत मनपा सेवेत रुजू होण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत होते. मागील आठ दिवसांपासून झनझन यांनी मनपा प्रशासनावर बराच दबाव वाढविला होता. आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी त्यांना रुजू करून घेण्यास नकार दर्शविला. अखेर निलंबन काळातच झनझन यांना निवृत्ती स्वीकारावी लागली. सायंकाळी साडेपाच वाजता अग्निशमन विभागात झनझन यांना निरोप देण्यात आला. यावेळी नगररचना विभागाचे संचालक ए. बी. देशमुख, कर मूल्यनिर्धारण अधिकारी वसंत निकम यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.
निवृत्त होणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांमध्ये प्रमोद खोब्रागडे, ए. ओ. पवार, यामीन अली खान, अलका राजवैद्य, मंगला श्रीकांत (निलंबित), विश्वनाथ चौधरी, प्रकाश जोशी, मोहंमद एकबाल, रावसाहेब दांडगे, धनसिंग बकले, दादाराव तायडे, लक्ष्मण कांबळे, शिवाजी देवकाते, तान्हाजी ढोके, सुधाकर ढकळे, उत्तम खरात, रतन फुले, अनंता वाघमारे आदींचा समावेश आहे.