महानगरपालिकेचे अग्निशमन झोपेत !
By Admin | Updated: June 1, 2014 00:24 IST2014-05-31T23:41:55+5:302014-06-01T00:24:24+5:30
लातूर : येथील महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या झोपेचा फटका शहरातील एका रुग्णालयास शुक्रवारी मध्यरात्री बसला़

महानगरपालिकेचे अग्निशमन झोपेत !
लातूर : येथील महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या झोपेचा फटका शहरातील एका रुग्णालयास शुक्रवारी मध्यरात्री बसला़ रुग्णालयास आग लागल्यानंतर नागरिकांनी गांधी चौकातील अग्निशमन कार्यालयाकडे धाव घेतली असता चालक नसल्याचे सांगून त्यांना माघारी पाठविले़ त्यामुळे आगीत रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले आहे़ लातूरच्या आदर्श कॉलनीत डॉ़अजय मैंदरकर यांचे अॅक्सिडेंट हॉस्पिटल आहे़ प्रकृतीच्या कारणामुळे डॉ़मैंदरकर या रुग्णालयात गेल्या २ वर्षांपासून रुग्ण दाखल करुन घेत नाहीत़ मात्र याठिकाणी फर्निचर व वैद्यकीय यंत्रसामग्री अस्तिवात आहे़ दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री ११़३० वाजण्याच्या सुमारास या रुग्णालयास शॉर्टसर्किटमुळे आग लागली़ रुग्णालयास खेटूनच असलेल्या घरातील लाईट अचानक गेल्यामुळे कुटुंबियांनी बाहेर येऊन पाहिले असता रुग्णालयातून आगीचे लोट बाहेर पडताना दिसत होते़ त्यामुळे सर्वजण घराबाहेर पडले़ ही घटना कळविण्यासाठी तातडीने अग्निशमन दलाच्या कार्यालयात दूरध्वनी करण्यात आला़ मात्र तेथून प्रतिसाद मिळाला नसल्याने डॉ़मैंदरकर यांचे लहान बंधू स्वत: गांधी चौकातील कार्यालयात गेले होते़ मात्र याठिकाणी चालक नसल्याचे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली़ त्यामुळे एमआयडीसीतील अग्निशमन कर्यालयात जाऊन तेथून वाहन नेण्यात आले़ तोपर्यंत २० ते २५ मिनिटे वेळ झाला होता़ त्यामुळे हॉस्पिटलमधील फर्निचर, वैद्यकीय यंत्रसामुग्री आगीमुळे नुकसानग्रस्त झाली़ या घटनेत अंदाजे २ लाखांपर्यंत नुकसान झाल्याचा दावा डॉ़अजय मैंदरकर यांनी केला आहे़ दरम्यान, अग्निशमन दलाचे वाहन येईपर्यंत आसपासच्या नागरिकांनी आग बरीच आटोक्यात आणली होती़ त्यानंतर अग्निशमनच्या जवानांनी उर्वरित काम पूर्ण केले़ (प्रतिनिधी)उन्हाळ्याच्या दिवसांत आगीच्या घटना सर्वाधिक घडतात, ही वस्तूस्थिती आहे़ असे असतानाही अग्निशमन दलाच्या कार्यालयात दूरध्वनीवरुन प्रतिसाद मिळत नाही़ शिवाय, समक्ष गेल्यानंतरही चालक नसल्याची सबब सांगितली जाते़ रुग्णालयास लागलेली आग गंभीर असतानाही कर्मचारी मात्र ही घटना गांभिर्याने घेत नसल्याचेच समोर आले आहे़