धर्माबादेत महाराष्ट्र बँकेला आग
By Admin | Updated: August 11, 2014 01:54 IST2014-08-11T01:18:31+5:302014-08-11T01:54:27+5:30
धर्माबाद : येथील बँक आॅफ महाराष्ट्र बँकेला आग लागल्याने बँकेतील सर्व साहित्य, संगणक, दफ्तरऐवज, वाऊचर, व्यवस्थापकांचे कॅबिन जळून खाक झाले़

धर्माबादेत महाराष्ट्र बँकेला आग
धर्माबाद : येथील बँक आॅफ महाराष्ट्र बँकेला आग लागल्याने बँकेतील सर्व साहित्य, संगणक, दफ्तरऐवज, वाऊचर, व्यवस्थापकांचे कॅबिन जळून खाक झाले़ ही घटना १० आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजता घडली़ शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे़ विशेष म्हणजे बँकेतील पैसे सुरक्षित असल्याचे सांगितले जाते़ आग विझविल्यानंतरही बँक व्यवस्थापन उपस्थित नव्हते, ते बाहेरगावी असल्याचे कळाले़
शहरातील जि़प़ कन्या शाळा समोरील मुख्य रस्तयावर किरायाच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर बँक आॅफ महाराष्ट्र शाखा असून त्याखाली एटीएम आहे़ या बँकेतील व्यवस्थापकासह कर्मचारी ये-जा करीत असून १० आॅगस्ट रोजी रक्षाबंधन व रविवारची सुट्टी असल्याने सर्व कर्मचारी, मॅनेजर शनिवारी नेहमीप्रमाणे काम करून गावाकडे निघून गेले़
१० आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजता बँकेतून धूर निघत असल्याचे काही नागरिकांना दिसले़ काही वेळातच आग फैलावली़ यात बँकेतील सर्व साहित्य, आठ संगणक, दोन प्रिंटर, दफ्तर ऐवज, वाऊचर, व्यवस्थापकाचे कॅबिन आदी साहित्य जळून खाक झाले़ बँकेच्या बाजूलाच एसबीएच बँकेचे सेक्युरिटी गार्ड बळीराम देवराव लहाने यांना माहिती मिळताच नगरपालिकेला त्यांनी संपर्क साधला़ अग्नीशमन गाडी आग विझविण्यासाठी आली़
एसबीएच बँकेचे सेक्युरिटी पी़व्ही़ गोरे, नारायण कोंडुरे, पाईकराव, सूर्यतळे आणि याच बँकेतील सेवक शशिकांत वाघमारे, दत्ता नाईकवाड यांनी आत जावून धूर बाहेर जाण्यासाठी काचा फोडल्या व आग विझविण्याचा प्रयत्न केला़ तसेच धर्माबाद पोलिस ठाण्याचे पो़नि़ अनंत पराड, पोलिस उपनिरीक्षक गिरी ओमकार तत्काळ उपस्थित झाले़ बँक व्यवस्थापक बाहेरगावी असल्याने आग विजेपर्यंत घटनास्थळी आले नव्हते़
बँक आॅफ महाराष्ट्र शाखेला सेक्युरिटी गार्ड नाही़ येथील कर्मचारी ये-जा करीत असून स्थानिक ठिकाणी असते तर एवढी मोठी घटना घडली नसती असे नागरिकांचे म्हणणे आहे़ सदर आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे़ (वार्ताहर)