जालना : शहरातील बसस्थानक रस्त्यावरील पोलीस कॉम्प्लेक्ससमोर असलेल्या चार दुकानांना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास भीषण आग लागली. ऐन लक्ष्मीपूजनाच्या घटिकेला लागलेल्या या आगीत कृषी आणि वस्तू भांडारचे साहित्य जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही.पोलीस कॉम्प्लेक्सच्या इमारतीसमोरील मुख्य रस्त्यावर जुन्या मोंढ्याच्या बाजूने असलेल्या सत्कार वस्तू भंडार या दुकानाच्या गोदामाला सुरुवातीला आग लागली. गोदामामधून धूर बाहेर येऊ लागल्यामुळे आजूबाजूच्या दुकानदारांनी सत्कार वस्तू भंडारचे श्रीमान देविदान यांना माहिती दिली. अग्निशमन दलासही कळविले. या दुकानात मंडप, पडदे, गाद्या व अन्य साहित्य असल्यामुळे आग भडकली. गोदामाच्या वरच्या बाजूस असणारे पत्रे आगीमुळे पडल्याने आगीचे उंचच उंच लोळ बाहेर येऊ लागले.
चार दुकानांना आग, लाखोंचे साहित्य भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 00:28 IST