अग्नी प्रतिबंधक नळकांड्या नावापुरत्याच

By Admin | Updated: November 20, 2014 00:48 IST2014-11-20T00:40:05+5:302014-11-20T00:48:06+5:30

लातूर : आपत्कालीन यंत्रणेअंतर्गत अचानक लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नी प्रतिबंधक नळकांड्या महाविद्यालयामध्ये असाव्यात,

Fire extinguisher only | अग्नी प्रतिबंधक नळकांड्या नावापुरत्याच

अग्नी प्रतिबंधक नळकांड्या नावापुरत्याच



लातूर : आपत्कालीन यंत्रणेअंतर्गत अचानक लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नी प्रतिबंधक नळकांड्या महाविद्यालयामध्ये असाव्यात, असा नियम आहे़ त्या अंतर्गत शहरातील नामांकित पाच महाविद्यालयात भेट दिली असता, अग्नी प्रतिबंधक नळकांड्यांची ही यंत्रणा केवळ नावापुरतीच आहे, असे निदर्शनास आले़
कोणतीही आपत्ती सांगून येत नाही़ त्यामुळे त्या विपदेला किंवा आपत्तीला तोंड देण्यासाठी सदैव तत्पर राहणे गरजेचे असते. ज्याप्रमाणे एखादी कौटुंबीक आपत्ती अचानक उद्भवू शकते त्याप्रमाणे एखादी नैसर्गिक आपत्ती उद्भवू शकते़ मानवनिर्मित कृत्रिम आपत्ती अचानक उद्भवू शकते़ त्यामुळे त्या आपत्तीला तोंड द्यायचं कसं़ या प्रश्नापेक्षा हल्ली त्या यंत्रणेचं व्यवस्थापन करायच कसं हा प्रश्न अधिक महत्वाचा ठरु लागला आहे़ त्यासाठी आपआपल्या स्थानिक किंवा अगदी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन धड्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवरील पाठ आपल्याला खुप काही शिकवून जातात़ त्याच्या अनुभवातून आपत्तीचे नियोजन हे महत्वाचे ठरते़
या आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत महाविद्यालयात अचानक एखादी आपत्ती आल्यास व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काय पाऊल उचलू शकते. याबाबत, शहरातील पाच नामांकित महाविद्यालयाला भेटी देऊन, त्याबाबतचा आढावा घेतला असता, शहरातील हे नामांकीत महाविद्यालये अद्यापही आपत्कालीन यंत्रणेबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले़ केवळ अग्नी प्रतिबंधक नळकांडे लावून ठेवले असून, त्याबाबत कोणालाही निश्चितपणे सांगता आले नाही़ पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतन महाविद्यालयाला भेट दिली असता, महाविद्यालयाचे प्रबंधक शैलेश गायकवाड यांनी आकस्मित आग लागल्यास यापासून विद्यार्थ्यांचा बचाव करण्यासाठी अग्नी प्रतिबंधक नळकांड्या महाविद्यालयात असल्याची माहिती दिली़ पण हे नळकांड्या २००७-०८ साली लावलेली आहेत़ या नळकांड्यांची कालमर्यादा ही एक वर्षाचीच आहे़ या एक वर्षानंतर त्याचे रिफिलींग करुन घ्यावे लागते़ त्यानंतरच ते वापरण्यास योग्य राहते़ अन्यथा त्याचा उपयोग होत नाही़ अन्य आपत्ती व्यवस्थापनाबद्दल मात्र महाविद्यालयीन व्यवस्थापन हे अनभिज्ञ होते़
दयानंद वाणिज्य महाविद्यालयास भेट दिली असता, या महाविद्यालयात दोन हजार विद्यार्थी संख्या आहे़ या महाविद्यालयातील अधिक्षक आऱडीक़ुरे यांच्याशी चर्चा केली असता, आपत्ती व्यवस्थापन याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले़ पण महाविद्यालयात आगीची घटना घडल्यास आग विझविण्यासाठी अग्नी प्रतिबंधक एक नळकांडी ठेवल्याचे सांगितले़ ही नळकांडे २००९ साली बसवण्यात आली असून त्यानंतर तिची रिफिलींग करण्यात आली नाही़ त्याचा वापर कसा करायचा याबाबतची माहिती त्यांना व अन्य कर्मचाऱ्यांना नसल्याचे सांगितले़
दयानंद कला महाविद्यालयात एक हजारापर्यंत विद्यार्थी संख्या असून या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़वामन पाटील यांनी या महाविद्यालयात ग्रंथालय व महाविद्यालयाच्या परिसरात दोन अग्नी प्रतिबंधक नळकांड्या बसवण्यात आल्याचे सांगितले़ तसेच विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण दिल्याचे त्यांनी सांगितले़
बसवेश्वर महाविद्यालयात ४५०० विद्यार्थी संख्या आहे़ या महाविद्यालयात कला, विज्ञान, वाणिज्य, कनिष्ठ व वरिष्ठ अशी महाविद्यालये कार्यरत आहेत़ पण या महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन नेमके काय आहे, याची माहिती नाही़ तसेच अग्नी प्रतिबंधक नळकांड्या केवळ लॅबोरेटरी मध्ये दोन असून तेही १९९६ साली बसवले आहेत़ त्यानंतर मात्र त्याकडे कुणीही पाहिले नाही़ लॅबमधील कर्मचाऱ्यांना त्याचा वापर कसा करायचा, याची माहिती नाही किंवा प्रशिक्षणही नाही़
दयानंद विज्ञान महाविद्यालय एक हजार विद्यार्थी आहेत़ या ठिकाणी कनिष्ठ लघुलेखक बी़जीक़ांबळे यांना भेटले असता, त्यांनी महाविद्यालयात ही यंत्रणा कोणाकडे आहे याबाबत चौकशी केली़ आपत्ती व्यवस्थापन नेमके काय आहे़ याची त्यांना व त्यांच्या सहकार्यांना कसलीच माहिती नसल्याची बाब पुढे आली़ तर अग्नी प्रतिबंधक नळकांड्या असूनही तेही बंद कपाटात ठेवले असून ते काढून दाखविण्यात आले व परत कपाटात कुलुप लावून ठेवण्यात आल्या आहेत.
अन्य कर्मचाऱ्यांना या अग्निप्रतिबंधक नळकांड्या आपल्या महाविद्यालयात आहेत की नाही, यासाठी तीन ते चार प्राध्यापकांना फोन करून आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात तसेच अग्निप्रतिबंधक नळकांड्याबाबत चौकशी करावी लागली. त्याऊपरही याबाबत कोणीही सांगू शकले नाही, अशी अवस्था येथील व्यवस्थापनाची झाली होती.
मागील काही महिन्यात जनरेटरची समस्या उद्भवल्याने आम्ही अग्नी प्रतिबंधक नळकांड्या चालू स्थितीत असल्याचे राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्रबंधक धुमाळ यांनी सांगितले. तर नुकतेच नॅक कमिटी येऊन गेल्याने अग्नी प्रतिबंधक नळकांड्या नवेच घेतल्याचे दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़वामन पाटील यांनी सांगितले़
राजर्षी शाहू महाविद्यालयात ३३०० विद्यार्थी संख्या आहे़ या महाविद्यालयात प्रबंधक धुमाळ बी़डी़ आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्याचे सांगितले़ अग्नी प्रतिबंधक नळकांड्या त्यांच्याच कार्यालयात दोन असल्याचे निदर्शनास आले़ त्यातील एक चालू स्थितीत असल्याची दिसून आले़ तर दुसरे रिफिलींग केलेले दिसून आले़ पण त्यावरती तारखेचा उल्लेख दिसून आला नाही़ यामुळे शहरातील महाविद्यालय आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात अनभिज्ञ असल्याचे दिसून आले़

Web Title: Fire extinguisher only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.