धारूर शहरामध्ये अग्नितांडव
By Admin | Updated: December 24, 2016 21:54 IST2016-12-24T21:52:31+5:302016-12-24T21:54:48+5:30
धारूर : शहरातील मुख्य रस्त्यावरील ८ दुकानांना शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास लागलेल्या अचानक आगीमुळे जवळपास १ कोटी रुपयांचे नुकसान झाले

धारूर शहरामध्ये अग्नितांडव
धारूर : शहरातील मुख्य रस्त्यावरील ८ दुकानांना शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास लागलेल्या अचानक आगीमुळे जवळपास १ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याने हे आठही दुकानदार रस्त्यावर आले आहेत. या दुकानांतील सर्व माल जळून खाक झाला. या आगीने रौद्र स्वरूप धारण केले होते. मात्र, पुढील एक दुकान जेसीबीने काढून ही आग आटोक्यात आणण्यासाठी रात्रीच्या वेळीही हजारो नागरिक रस्त्यावर मदतीकरिता सरसावले होते.
शहरातील मुख्य रस्त्यावर भरवस्तीमधील गजानन शॉपिंग कॉम्प्लेक्ससमोर असणाऱ्या दुकानाने शुक्रवारी रात्री अचानक पेट घेतला. बघता बघता आठ दुकानांना या आगीने वेढले. या आगीचे स्वरूप एवढे भीषण होते की, माणूसही जवळ जाऊ शकत नव्हता. रात्रीची वेळ असल्याने अचानक विद्युत पुरवठा खंडित झाला; मात्र या आगीचा उजेड गावाच्या कानाकोपऱ्यात दिसू लागल्याने जागे असणारा प्रत्येक जण या घटनास्थळाकडे धावला.
घटनास्थळी ही दुकाने आगीत भस्मसात होत असल्याचे पाहताच या दुकानातील माल बाहेर काढण्याचाही प्रयत्न झाला. धारूर न.प.च्या अग्निशामक दलाचे वाहन तात्काळ घटनास्थळी आले. त्याचबरोबर केज, अंबाजोगाई, कळंब, माजलगाव येथील वाहनेही तात्काळ बोलावण्यात आली. या आगीने रौद्रस्वरूप धारण करू नये यामुळे ही दुकानांची साखळी जेसीबीने तोडण्यात आली. या आगीमध्ये राम पिलाजी यांचे अपना जनरल स्टोअर्स, शिवकुमार पिलाजी यांचे सराफी दुकान, नेटके यांचे बुटाचे दुकान, बाबू कुंभार यांचे किराणा दुकान, सोनवणे यांचे बुटाचे दुकान, धनंजय पिलाजी यांची मोबाईल शॉपी, हेमंत पिलाजी यांचे जनरल स्टोअर्स व मोमीन यांचे हॉटेल आगीत पूर्णपणे जळून खाक झाले. यामधील तीन ते चार दुकानदार अत्यंत गरीब परिस्थितीतील असल्याने ते रस्त्यावर आले आहेत.
ही आग पाहिल्यावर ती मंडळी ओक्साबोक्सी रडत होती. मात्र, त्यांना सावरण्याचा प्रयत्नही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्यांनी केला. बाजूच्या दुकानांना नुकसान होऊ नये म्हणून त्या दुकानातील साहित्यही बाहेर काढण्यात आले होते. ही आग नेमकी कशाने लागली हे समजू शकले नाही. शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी रात्रीची वेळ असतानाही शहरातील हजारो नागरिक रस्त्यावर आले होते. रात्री पावणेबाराला लागलेली आग सकाळी पाच वाजता आटोक्यात आली. सकाळी उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते. (वार्ताहर)