फटाका आग प्रकरणात दोन दिवसांत गुन्हे दाखल
By Admin | Updated: November 3, 2016 01:35 IST2016-11-03T01:26:50+5:302016-11-03T01:35:11+5:30
औरंगाबाद : औरंगपुरा येथील जि. प. मैदानावरील फटाका बाजार शनिवारी आगीत जळून खाक झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

फटाका आग प्रकरणात दोन दिवसांत गुन्हे दाखल
औरंगाबाद : औरंगपुरा येथील जि. प. मैदानावरील फटाका बाजार शनिवारी आगीत जळून खाक झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासात फटाका मार्केटमधील अनेक गौडबंगाल समोर येऊ लागले आहे. लायसन्स एकाच्या नावावर तर दुकानचालक दुसराच असल्याचे समोर आले. अशा प्रकारे बेकायदेशीरपणे लायसन्सची हेराफेरी करून दुकाने थाटणाऱ्या दुकानदार आणि लायसन्सधारकांविरुद्ध दोन दिवसांत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
फटाका बाजाराला लागलेल्या आगीचा तपास गुन्हे शाखेने सुरू केला आहे. याविषयी पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले की, या बाजारासाठी १८६ दुकानांसाठी लायसन्स देण्यात आले होते. यापैकी तेथे १४० दुकाने थाटण्यात आली. या दुकानदारांच्या लायसन्सची चौकशी आम्ही सुरू केली आहे. फटाका दुकानासाठी पोलीस प्रशासनाकडून लायसन्स दिल्या जाते. फटाका मार्केटमधील अनेक दुकानदारांनी त्यांचे लायसन्स दुसऱ्यांना वापरण्यासाठी दिल्याचे तपासात समोर येत आहे. दुसऱ्याच्या लायसन्सवर दुकाने थाटणे बेकायदेशीर असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.
त्यापैकी किती मूळ लायसन्सधारक दुकानदारांची दुकाने होती, याचा शोध घेतला जात आहे. किती जणांनी आपले लायसन्स दुसऱ्यांना वापरण्यास दिले होते, याचा तपास सुरू आहे. दोषी आढळणाऱ्या लायसन्सधारकांवर आणि दुसऱ्याच्या लायसन्सवर दुकान थाटणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले जातील.