छत्रपती संभाजीनगर : चेलीपुरा परिसरातील महावीर घरसंसार मॉलला रविवारी मध्यरात्री १२.१० मिनिटांनी आग लागली. या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची माहिती उपस्थितांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या आगीने शेजारच्या पाच- सहा दुकानांनाही वेढा घातला असून, त्यात एका गणपती मंदिराचाही समावेश आहे. ही आग शमविण्यासाठी शहराच्या सर्व भागांतून अग्निशमनचे बंब मागविण्यात आले आहेत. मध्यरात्री ०१:०० वाजेपर्यंत केवळ दोन बंब घटनास्थळी पोहोचल्याचेही उपस्थितांनी सांगितले.
चेलीपुरा भागातील सर्व प्रकारचे साहित्य असलेल्या महावीर घरसंसार मॉलला मध्यरात्री आग लागली. या आगीने काही वेळातच संपूर्ण मॉलला वेढा घातला. त्यामुळे आतमधून धुरासह जाळाचे लोळ बाहेर येऊ लागले. त्यामुळे ही आग शेजारच्या पाच ते सहा दुकानांनाही आगीने वेढले. ही माहिती १२.१० मिनिटांनी अग्निशमन विभागाला देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी पोहोचले होते. मात्र, आगीने काही वेळातच संपूर्ण मॉलला वेढा घातला. त्यातून ही आग आसपासच्या दुकानांमध्ये पसरल्याचे घटनास्थळावर असलेल्या नागरिकांनी सांगितले. या मॉलच्या परिसरात असलेल्या गणपती मंदिरालाही आगीने वेढा घातला होता. ०१:०० वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले नव्हते. त्यामुळे शहरासह औद्याेगिक परिसरातून अग्निशमन विभागाचे बंब मागविण्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
कोट्यवधी रुपयांचे नुकसानया प्रसिद्ध मॉलला आग लागल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शिवाय शेजारच्या दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचेही उपस्थितांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.