नाल्यांवरील मालमत्ता शोधा!
By Admin | Updated: January 12, 2016 00:05 IST2016-01-11T23:56:52+5:302016-01-12T00:05:36+5:30
औरंगाबाद : नाल्यांवरील अतिक्रमणांमुळे शहरात अनेक ठिकाणी भूमिगत गटार योजनेचे काम रखडले आहे. मुख्य ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी नाल्यांवरील काही

नाल्यांवरील मालमत्ता शोधा!
औरंगाबाद : नाल्यांवरील अतिक्रमणांमुळे शहरात अनेक ठिकाणी भूमिगत गटार योजनेचे काम रखडले आहे. मुख्य ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी नाल्यांवरील काही मालमत्ता पाडाव्या लागणार आहेत. अशा मालमत्तांची यादी तातडीने तयार करण्याचे आदेश महापौर त्र्यंबक तुपे यांनी सोमवारी दिले.
महापौर त्र्यंबक तुपे यांनी सोमवारी भूमिगत गटार योजनेच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, अफसर सिद्दीकी यांच्यासह ठेकेदार एजन्सी आणि पीएमसीचे प्रतिनिधी उपस्थित होते. अंतर्गत ड्रेनेज लाईन बदलण्याचे काम संथ गतीने सुरू असल्याबद्दल महापौरांनी नाराजी व्यक्त केली. नगरसेवकांनी वारंवार सांगूनही कामे होत नाहीत, ही गंभीर बाब आहे. योजनेच्या निधीत १२० कोटी रुपयांची कपात झाल्याचे कारण ठेकेदार एजन्सीकडून दिले जाते. परंतु ते चालणार नाही. जिथे गरज आहे, तिथे प्रायॉरिटीने कामे झालीच पाहिजे, असे महापौर म्हणाले. यावेळी नाल्यांवरील अतिक्रमणांचाही मुद्दा उपस्थित झाला. प्रमुख सहा नाल्यांमधून मुख्य ड्रेनेज लाईन टाकली जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी नाल्यांत इमारती उभ्या असल्यामुळे तिथे काम रखडले आहे. अशा मालमत्ता पाडल्याशिवाय तिथे मुख्य ड्रेनेज लाईन टाकणे अवघड आहे, असे अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर महापौरांनी जिथे कुठे बाजूने ड्रेनेज लाईन नेणे शक्य आहे, तिथे बाजूने न्या, जिथे ते शक्य नसेल तिथे कारवाई करा, अशा सूचना दिल्या. योजनेचे काम तातडीने मार्गी लागावे यासाठी अडथळा ठरणाऱ्या आणि पाडाव्या लागणाऱ्या मालमत्तांची यादी तातडीने तयार करून सादर करा, असेही महापौर म्हणाले.