दस्तावेज मिळेनात
By Admin | Updated: July 23, 2016 01:08 IST2016-07-23T00:32:32+5:302016-07-23T01:08:37+5:30
व्यंकटेश वैष्णव , बीड तालुक्यातील ताडसोन्ना येथील लाखो रुपयांचा स्वस्त धान्य घोटाळा प्रकरणी पोलिसांना पुरेसे कागदपत्र मिळत नसल्याने तपासाची गती मंदावली आहे

दस्तावेज मिळेनात
व्यंकटेश वैष्णव , बीड
तालुक्यातील ताडसोन्ना येथील लाखो रुपयांचा स्वस्त धान्य घोटाळा प्रकरणी पोलिसांना पुरेसे कागदपत्र मिळत नसल्याने तपासाची गती मंदावली आहे. याबाबत सहायक निरीक्षकांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना शुक्रवारी पत्र पाठवून तात्काळ माहिती न दिल्यास आपण दोषींना पाठीशी घालतात असे समजण्यात येईल, असा इशारा सहायक निरीक्षकांनी पत्राद्वारे दिला आहे.
बीड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार परवीन पठाण यांच्या फिर्यादीवरून बीड तालुक्यातील पिंपळनेर ठाण्यात ताडसोन्ना येथील स्वस्त धान्य दुकानदाराच्या विरोधात एक महिन्यापूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक गजानन जाधव या प्रकरणाचा तपास करीत आहेत. तपासादरम्यान ज्या काळात स्वस्त धान्य घोटाळा झाला, त्या दरम्यान कार्यरत असणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह मूळ दस्ताएवजांची फाईल पोलिसांनी मागितली आहे.
यापूर्वी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष राऊत यांनी पिंपळनेर पोलिसांनी मागितलेली काही महत्त्वाची कागदपत्रे दिलेली असल्याचे सूत्रांकडून समजते.
बीड तालुक्यातील पिंपळनेर व बीड गोदामाचा तत्कालीन पदभार नेमका कोणाकडे होता, तेव्हा दिलेले परमिट कोणाच्या स्वाक्षरीवरून देण्यात आले, स्वस्त धान्य दुकानदारास एका महिन्यात एका नंबरच्या परमिटवर एच रजिस्टरला नोंद करून धान्य देता येते काय, देता येत असल्यास जी.आर.ची सत्यप्रत देण्यात यावी, अशी मागणी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस सहनिरीक्षक यांनी पत्राद्वारे केली आहे.
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांमार्फत सर्व माहिती पोलिसांना मिळाली असली तरी धान्य घोटाळा प्रकरणात २०१४ ते नोव्हेंबर २०१५ या काळामध्ये संबंधित गोदामाचा अव्वल कारकून चार्ज कोणाकडे होता, त्यांना चार्ज दिल्याची आॅर्डर आहे का? असेल तर त्याची एक प्रत द्यावी, अशी मागणी पिंपळनेर पोलीस ठाण्याकडून करण्यात आली आहे.
२३ जुलैपर्यंत पुरवठा विभागाकडून माहिती न मिळाल्यास व या प्रकरणात आरोपींना जामीन झाल्यास याला आपण सर्व (पुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी) जबाबदार रहाल. शिवाय आरोपीस मदत करतात, असे समजण्यात येईल, अशी तंबी पिंपळनेर पोलिसांनी पुरवठा विभागाला दिली आहे.
बीड तहसील कार्यालयांतर्गत पिंपळनेर येथील गोदामाचा पदभार ज्या कर्मचाऱ्यांकडे होता, त्यांच्याकडून सर्व मूळ कागदपत्रांची मागणी केली जात आहे. यातील काही रेकॉर्ड शोधूनही मिळून येत नसल्याने मागील आठ दिवसांपासून मूळ दस्तावेजाची शोधाशोध सुरू आहे.
४या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या पिंपळनेर पोलिसांना मात्र पुरेशा दस्तावेजाअभावी तपासात गती मिळत नसल्याने शेवटी पिंपळनेर पोलिसांनी पुरवठा विभागाला पत्र काढून माहिती न मिळाल्यास व संबंधित आरोपींना जामीन मिळाल्यास सहआरोपी करण्याची तंबी दिली आहे. त्यामुळे याप्रकरणाची व्याप्ती अजून वाढतच चालली आहे.