आर्थिक कागदपत्रे तपासली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:47 IST2018-06-04T00:45:22+5:302018-06-04T00:47:51+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या कार्यकाळात नियुक्त्यांमध्ये गडबड, आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने शुक्रवार आणि शनिवारी ठाण मांडून आर्थिक गैरव्यवहारांच्या कागदपत्रांची तपासणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आर्थिक कागदपत्रे तपासली
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या कार्यकाळात नियुक्त्यांमध्ये गडबड, आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने शुक्रवार आणि शनिवारी ठाण मांडून आर्थिक गैरव्यवहारांच्या कागदपत्रांची तपासणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या कारभाराविषयी विरोधी पक्षनेते, लोकप्रतिनिधींसह ३९ जणांनी राज्यपाल कार्यालयाकडे पुराव्यानिशी तक्रारी केल्या आहेत. यावर राज्यपालांनी कुलगुरूंच्या कार्यकाळातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली. या चौकशी समितीचे अध्यक्ष माजी कुलगुरू डॉ. एस.एफ. पाटील, सदस्य डॉ. गोविंद कथलाकुट्टे आणि डॉ. बी.बी. पाटील हे शुक्रवारी दुपारी विद्यापीठात दाखल झाले होते. या समितीने चार कोटी रुपयांची उचल, उत्तरपत्रिका, रुसाअंतर्गत यंत्रांची खरेदी आदी आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपासंदर्भातील कागदपत्रांची तपासणी केली असल्याचे समजते. याविषयीची कागदपत्रेही समितीने हस्तगत केली आहेत. पहिल्या भेटीत समितीने अभ्यास मंडळावर सदस्यांच्या केलेल्या नेमणुका, प्रभारी अधिष्ठातांना दिलेले अमर्याद अधिकार याविषयीची कागदपत्रे हस्तगत केली होती. यानंतर दुसऱ्या भेटीत आर्थिक गैरव्यवहारांच्या प्रकरणांची कागदपत्रे हस्तगत केल्याची चर्चा आहे.