अखेर बीडसाठीची तिकीट दरवाढ रद्द
By Admin | Updated: January 28, 2017 00:44 IST2017-01-28T00:40:58+5:302017-01-28T00:44:25+5:30
पारगाव : बीड येथे जाण्यासाठी अंतर वाढल्यामुळे भूम, परंडा आगाराने केलेल्या तिकिट दरवाढीबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर याची दखल घेत आगारांनी तातडीने ही दरवाढ मागे घेतली.

अखेर बीडसाठीची तिकीट दरवाढ रद्द
पारगाव : बीड येथे जाण्यासाठी अंतर वाढल्यामुळे भूम, परंडा आगाराने केलेल्या तिकिट दरवाढीबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर याची दखल घेत आगारांनी तातडीने ही दरवाढ मागे घेतली. त्यामुळे प्रवाशांत समाधान व्यक्त होत आहे.
बिंदुसरा नदीपात्रावरील पूल कमकुवत असल्याने बीड शहरात व पुढे औरंगाबादकडे जाणाऱ्या बसेस या ४ किमी अंतरावरून तेलगाव नाका, खंडेश्वरी, मोढा नाकामार्गे सोडल्या जात होत्या. त्यामुळे बीडसह भूम, परंडा आगाराच्या प्रमुखांनी तिकिटामध्ये ७ रुपयांची वाढ केली होती. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक झळ तर बसतच होती, शिवाय वेळेचा अपव्यही होत होता. त्यामुळे प्रशासनाने बिंदुसरा पात्रातच एक पर्यायी रस्ता सुरू करून प्रवाशांची गैरसोय दूर केली. परंतु, पर्यायी रस्ता होऊनही या तिन्ही आगारांनी केलेली दरवाढ रद्द केली नव्हती. ‘एआयएसएल’ या विद्यार्थी संघटनेने ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर बीड आगाराने तातडीने कार्यवाही करीत दरवाढ रद्द केली. मात्र, भूम-परंडा आगाराकडून ती कायम ठेवण्यात आली होती. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिध्द करताच एसटी प्रशासनाने याची गांभिर्याने दखल घेत दरवाढ कमी करण्याचा निर्णय घेऊन तो अंमलातही आणला. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.