अखेर वांजरवाड्यातील शाळा भरली
By Admin | Updated: July 20, 2014 00:32 IST2014-07-20T00:17:06+5:302014-07-20T00:32:40+5:30
जळकोट : वांजरवाडा येथील एका शैैक्षणिक संस्थेतील अंतर्गत वादातून गेल्या दोन दिवसांपासून शाळा बंद होती़

अखेर वांजरवाड्यातील शाळा भरली
जळकोट : वांजरवाडा येथील एका शैैक्षणिक संस्थेतील अंतर्गत वादातून गेल्या दोन दिवसांपासून शाळा बंद होती़ अखेर शुक्रवारी उपशिक्षणाधिकाऱ्यानी बैठक घेवून शिक्षक, कर्मचारी व गावकऱ्यांत समझोता घडवून आणला़ त्यामुळे तिसऱ्या दिवशी शाळा भरली़
जळकोट तालुक्यातील वांजरवाडा येथील श्री संत गोविंद स्मारक विद्यालयात दोन गटांत वाद आहे़ या वादातून बुधवारी शाळेतील कनिष्ठ लिपिक श्रीकांत कुलकर्णी यांना मारहाण करण्यात आली होती़ या घटनेमुळे गुरूवारी गावातील नागरिकांनी शाळेस कुलूप ठोकले़ दरम्यान गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता़ या पोलिस गाडीवरही संतप्त अज्ञातांनी दगडफेक केली होती़ यात दोन शिक्षक कर्मचारी जखमी झाले होते़
या घटनेमुळे गेल्या दोन दिवसांपासून शाळेत तणावाचे वातावरण होते़ त्यामुळे दोन्ही दिवस शाळा भरू शकली नाही़ शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी गारकर यांनी विद्यालयातील शिक्षक त्याच बरोबर गावकऱ्यांची बैठक घेतली़ यावेळी पोलिस निरीक्षक सितांबर कामठेवाड, गटशिक्षणाधिकारी सी़वाय़ कांबळे, सरपंच उपस्थित होते़ पालकांनी शिष्यवृत्ती मिळत नसल्याचे सांगितले़ त्याच बरोबर विद्यार्थ्यांना मारहाण करू नये, शालेय व्यवस्थापन समिती नियुक्त करावी अशा समस्या मांडल्या़ गारकर यांनी अशा घटना पुन्हा घडणार नाहीत़ असे सांगितल्यानंतर ग्रामस्थ समझोत्यास तयार झाले़ त्यामुळे तिसऱ्या दिवशी शाळा भरली़(वार्ताहर)