अखेर वेतनाचा प्रश्न सुटला़़़
By Admin | Updated: August 21, 2014 23:18 IST2014-08-21T23:08:05+5:302014-08-21T23:18:11+5:30
परभणी : अनेक वर्षांपासून रखडत पडलेला महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न अखेर निकाली निघाला.

अखेर वेतनाचा प्रश्न सुटला़़़
परभणी : अनेक वर्षांपासून रखडत पडलेला महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न अखेर निकाली निघाला. शासनाने मनपा कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सहायक अनुदान मंजूर करण्याचा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी मनपा कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून हा आनंदोत्सव साजरा केला.
दोन वर्षांपूर्वी परभणी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर झाले. महानगरपालिका झाली खरी परंतु कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून मिळणारे सहायक अनुदान बंद करण्यात आले. मनपाच्या उत्पन्नातून कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याच्या सूचना शासनास्तरावरुन देण्यात आल्या. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांचे वेतन सातत्याने थकले जात होते. सहा-सहा महिने कर्मचाऱ्यांचे वेतन होत नव्हते़ वेतन नसतानाही या कर्मचाऱ्यांना काम मात्र वेळच्या वेळी करावे लागत़ कुटुंबाची उपासमार होत असल्याने मनपाच्या कामाबरोबरच इतर कामेही काही कर्मचाऱ्यांना करावी लागली़ वेतन वेळेवर होत नसल्याने कर्मचारी अडचणीत सापडले होते़ नव्याने महानगरपालिका झाली आणि कर्मचाऱ्यांचे वेतन मात्र होत नव्हते. त्यामुळे विकासकामे ठप्प झाली होती़ कर्मचाऱ्यांचे वेतन रखडत असल्याने अनेकवेळा आंदोलने झाली़ संप पुकारण्यात आला़ कामबंद आंदोलन करण्यात आले़ परंतु, हा तिढा काही सुटला नव्हता़ महानगरपालिकेला एलबीटी आणि मनपा उत्पन्नातून कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याचे धोरण शासनाने आखले होते़ परंतु, परभणी शहर हे इतर शहरांच्या तुलनेने मागासलेले आहे़ या ठिकाणी उद्योग व्यवसाय म्हणावे तेवढे नाहीत़ परिणामी महानगरपालिकेचे उत्पन्न अत्यल्प होते आणि त्या तुलनेत खर्च मात्र अफाट होता़ या सर्वांचा ताळमेळ बसत नसल्याने कर्मचाऱ्यांचा प्रश्न गंभीर बनला होता़
विविध कर्मचारी संघटना आणि मनपा पदाधिकाऱ्यांनी देखील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला़ महापौर प्रताप देशमुख, उपमहापौर सज्जू लाला, सभापती विजय जामकर यांच्यासह नगरसेवकांचे यासाठी सहकार्य लाभले़
बुधवारी शासनाने महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सहाय्यक अनुदान देण्याचा निर्णय मंजूर केला़ त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निकाली निघाला असून, २१ आॅगस्ट रोजी कर्मचाऱ्यांनी फटाके वाजवून या निर्णयाचे स्वागत केले़ तसेच बी़ रघुनाथ सभागृह येथे बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांचे व मंत्री महोदयांचे आभार मानण्यात आले़ महापौर प्रताप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस आयुक्त अभय महाजन, उपमहापौर सज्जू लाला, सभापती विजय जामकर, विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे, उपायुक्त दीपक पुजारी, रणजीत पाटील, शहर अभियंता रमेश वाघमारे, रामराव पवार, प्रशासकीय अधिकारी उबेद चाऊस, नगरसेवक विजय धरणे, व्यंकट डहाळे, सचिन देशमुख, श्याम खोबे, सुनील देशमुख, अॅड़ जावेद कादर, गुलमीर खान, सचिन कांबळे, रामा गुजर, हसीब उर रहेमान, राजेश देशमुख, राजेंद्र वडकर, प्रमोद वाकोडकर, पाशा कुरेशी, हन्नूभाई, याकूबभाई, मेहराज कुरेशी, भीमराव वायवळ, शेख खाजा, युनियन नेते के़ के़ आंधळे, माधुरी क्षीरसागर, के़ के़ भारसाखळे, अनुसयाबाई जोगदंड आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती़ सूत्रसंचालन प्रकाश कुलकर्णी यांनी केले़ प्रास्ताविक उपायुक्त दीपक पुजारी यांनी केले़ उपायुक्त रणजीत पाटील यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)