अखेर नाईकवाडे निलंबित!
By Admin | Updated: March 22, 2016 01:32 IST2016-03-22T00:59:37+5:302016-03-22T01:32:21+5:30
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील बछड्यांच्या मृत्यू प्रकरणात प्राणिसंग्रहालय संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांना निलंबित करावे,

अखेर नाईकवाडे निलंबित!
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील बछड्यांच्या मृत्यू प्रकरणात प्राणिसंग्रहालय संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांना निलंबित करावे, असा ठराव सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. या निर्णयावर मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी शिक्कामोर्तब केले. नाईकवाडे यांचा पदभार अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्याकडे सोमवारी सोपविण्यात आला.
मनपा आयुक्तांनी तीन पानांचे निलंबन आदेश काढले आहेत. यामध्ये नाईकवाडे यांच्यावर एक नव्हे दोन नव्हेतर तब्बल ९ आरोप ठेवण्यात आले आहेत. निलंबन आदेशातच विभागीय चौकशीही करण्याचे आदेशित केले आहे. हेमलकसा येथून रेणू आणि राजा या बिबट्याच्या जोडीला आणताना अक्षम्य हलगर्जीपणा करण्यात आला. रेणू मादी गरोदर असतानाही तिची योग्य ती काळजी घेण्यात आली नाही. गॅस्ट्रो समजून चुकीचे औषधोपचार करण्यात आले. या निष्काळजीपणामुळे रेणू वेळेपूर्वीच प्रसूत झाली. तिने तीन बछड्यांना जन्म दिला. त्यांचीही योग्य निगा, काळजी न घेतल्याने ते ४८ तासांतच मरण पावले. या सर्व प्रकारामुळे महापालिकेची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली. या घटनांना प्राणिसंग्रहालय संचालक म्हणून आपण जबाबदार असल्याचे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.