अखेर लच्छू पहिलवान अटकेत

By Admin | Updated: July 18, 2016 01:13 IST2016-07-18T00:41:39+5:302016-07-18T01:13:07+5:30

शहरातील एका नगरसेविकेचे वडील लच्छू पहिलवान ऊर्फ लक्ष्मीनारायण बाखरिया आणि त्यांचा मुलगा लुमेश बाखरिया यांना रविवारी मध्यरात्री धावणी मोहल्ला येथून पोलिसांनी अटक केली.

Finally, the Lakhoo wrestler was arrested | अखेर लच्छू पहिलवान अटकेत

अखेर लच्छू पहिलवान अटकेत

औरंगाबाद : किरकोळ कारणावरून एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अनेक दिवसांपासून पोलिसांना वाँटेड असलेल्या शहरातील एका नगरसेविकेचे वडील लच्छू पहिलवान ऊर्फ लक्ष्मीनारायण बाखरिया आणि त्यांचा मुलगा लुमेश बाखरिया यांना रविवारी मध्यरात्री धावणी मोहल्ला येथून पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी सांगितले की, १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी उद्धवराव पाटील चौकातून रमीज खान इब्राहिम खान आणि त्यांचे मित्र तरबेज पठाण हे कारमध्ये बसून जात होते. त्यावेळी बाखरिया रस्त्यात उभे होते. तेव्हा तरबेज पठाण यांनी त्यांना बाजूला होण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने बाखरियांनी रमीज आणि तरबेज यांना कारमधून बाहेर ओढून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. स्टीलचा रॉड, फायटर आणि लाकडी दांड्याने या तरुणांना मारहाण करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना रुग्णालयात अनेक दिवस उपचार घ्यावे लागले.
याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात आपल्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे कळताच लच्छू पहेलवान फरार झाले होते. लच्छू पहेलवान हे शिवसेनेचे जुने कार्यकर्ते आहेत. त्यांची कन्या नगरसेविका आहे. लच्छू पहेलवान यांचा या घटनेशी संबंध नाही, अशी भूमिका घेत शिवसेनेने पोलीस आयुक्तांना निवेदन दिले होते, पण पोलीस आयुक्तांनी कोणताही हस्तक्षेप न करता थेट कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
मात्र, पाच महिन्यांनंतरही आरोपी सापडत नसल्यामुळे पोलीस आयुक्तांनी तपास अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना खडसावले. दरम्यान, लुमेश हा धावणी मोहल्ला येथील घरी असल्याची माहिती मिळताच बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक सलीम शेख यांनी रात्री ९ वाजेच्या सुमारास लुमेशला पकडले. लुमेशला पोलिसांनी अटक केल्याचे समजताच धावणी मोहल्ल्यात खळबळ उडाली. त्यानंतर पहाटे ३ वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक पवार, उपनिरीक्षक अमित बागूल, राहुल बांगर आणि कर्मचाऱ्यांनी लच्छू पहेलवान यांना अटक केली. तर तिसरा आरोपी गोट्या ऊर्फ शैलेश यास रविवारी सायंकाळी पोलिसांनी पकडले.

Web Title: Finally, the Lakhoo wrestler was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.