अखेर ईशाचा मारेकरी पकडला
By Admin | Updated: August 13, 2014 01:06 IST2014-08-13T00:38:17+5:302014-08-13T01:06:20+5:30
गेवराई : येथील चिंतेश्वर भागात राहणाऱ्या सात वर्षीय ईशा मोरया या मुलीच्या खुनाचा पोलिसांनी छडा लावला आहे. या मुलीवर अतिप्रसंग केल्याचा खुलासा होईल

अखेर ईशाचा मारेकरी पकडला
गेवराई : येथील चिंतेश्वर भागात राहणाऱ्या सात वर्षीय ईशा मोरया या मुलीच्या खुनाचा पोलिसांनी छडा लावला आहे. या मुलीवर अतिप्रसंग केल्याचा खुलासा होईल या भीतीने महादेव परळकर याने तिचा गळा कापून शीर धडापासून वेगळे केले होते. आरोपीला कर्नाटक राज्यातून अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
२८ जून रोजी ईशा मोरया ही चिंतेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या एका दर्ग्याच्या पाठिमागे असलेल्या भागात खेळत होती. त्यावेळी महादेव परळकर तिला पायी जाताना दिसला. मला घरी सोडा असे इशा त्याला म्हणाली असता, आरोपीने तिला बलात्कार करण्याच्या उद्देशाने उचलून घेऊन जात असताना तिने आरडाओरडा केला.
घरी जाऊन ईशा घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगेल या भीतीने महादेव याने तिचा गळा वस्ताऱ्याने कापून धडापासून शीर वेगळे केले व शेताच्या बांधाच्या बाजूला अर्धवट पुरले व पळून गेला. दोन दिवसानंतर चिंतेश्वर मंदिराच्या परिसरात तिचा मृतदेह आढळून आला़
या प्रकरणी पोलिसांनी गेवराई शहरात तपास केला मात्र काही धागेदोरे हाती लागले नाही़ दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना महादेववर संशय होता. त्यामुळे ते त्याच्या मागावर होते़
म्हशी भादरायचा होता धंदा
महादेव परळकर (रा. चिंतेश्वर गल्ली, गेवराई) हा दूध व्यवसायीक होता. तसेच तो तालुक्यातील म्हशी भादरण्याचे काम करायचा. ईशा मोरयाच्या घराशेजारीच महादेव रहायचा. तिचा खून केल्यानंतर तो घरी जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी तो पंढरपुर यात्रेसाठी जात असल्याचे सांगून गेला. नंतर तो औरंगाबाद, परभणी येथील नातेवाईकांकडे गेला. त्याचा संपर्क होत नसल्याने त्याच्यावर संशयाची सुई फिरु लागली. मोबाईल नसल्याने त्याचे लोकेशन कळू शकत नव्हते़
शेवटी गुप्त माहितीवरुन पोलिसांना महादेव हा कर्नाटक राज्यातील चिटगोपा येथे असल्याचे कळाले. त्या पकडण्यासाठी पथक नेमण्यात आले होते. पथकाने त्यास सोमवारी ताब्यात घेतले, अशी माहिती अधीक्षक रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली़ त्यानंतर माहिती सांगणाऱ्याचा पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी बक्षीस देऊन सत्कार केला़
गेवराई पोलीस ठाणे येथील पत्रकार परिषदेत अधीक्षक रेड्डी यांच्यासह प्रशिक्षणार्थी पोलीस उप-अधीक्षक सुधीर खिरडकर, नारायण शिरगावकर, स्थागुशाखेचे पोनि सी.डी. शेवगण, गेवराई ठाण्याचे पोनी सुरेंद्र गंधम, शेख चाँद, पठाण आदी उपस्थित होते. (वार्ताहर)