अखेर फुले मार्केटच्या उभारणीला हिरवा कंदील
By Admin | Updated: February 2, 2015 01:11 IST2015-02-02T01:01:18+5:302015-02-02T01:11:46+5:30
संजय कुलकर्णी ,जालना शहरातील मुख्य बाजारपेठेची ‘शान’ समजल्या जाणाऱ्या महात्मा फुले मार्केटच्या नवीन इमारतीच्या बांधकामास अखेर नगरविकास खात्याकडून बीओटी तत्वावर

अखेर फुले मार्केटच्या उभारणीला हिरवा कंदील
संजय कुलकर्णी ,जालना
शहरातील मुख्य बाजारपेठेची ‘शान’ समजल्या जाणाऱ्या महात्मा फुले मार्केटच्या नवीन इमारतीच्या बांधकामास अखेर नगरविकास खात्याकडून बीओटी तत्वावर मंजुरी मिळाली असून या कामास प्रत्यक्षात दीड महिन्यानंतर प्रारंभ होणार आहे.
नगरपालिकेच्या मालकीची ही इमारत अत्यंत जीर्ण झाल्यामुळे २००५-०६ मध्ये पाडण्यात आली होती. सुरूवातीला व्यापाऱ्यांचा विरोध, त्यानंतर त्यांची संमती, व्यापाऱ्यांचे इतरत्र स्थलांतर या बाबींमध्ये काहीवेळ गेला. त्यानंतर या ठिकाणी नवीन इमारत तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र गेल्या आठ वर्षांपासून इमारतीच्या बांधकामास तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. काम नगरपालिकेने करावे की, बीओटी तत्वावर या मुद्यावरूनही सदस्यांमध्ये लवकर एकमत झाले नाही. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात यासंबंधीची संचिका दीर्घकाळ प्रलंबित होती.
फुले मार्केटची नवीन इमारत केव्हा होणार, याविषयीची शहरातील व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र, याबाबत प्रशासकीय पातळीवर कोणताही निर्णय होत नसल्याने या इमारतीच्या बांधकामला मुहूर्त केव्हा लागणार, असा प्रश्न निर्माण झाला होता.
नगरविकास खात्याच्या मंजुरीविना हे काम लांबणीवर पडले. अखेर नगरविकास खात्याने शनिवारी या कामास मंजुरी दिल्याने आता इमारत बांधकामाचा मार्ग सुकर झाला आहे. या इमारत बांधकामास मंजुरी मिळाल्याने व्यापाऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.