अखेर १८८ टँकरला जीपीएस यंत्रणा
By Admin | Updated: June 28, 2014 01:14 IST2014-06-28T00:14:06+5:302014-06-28T01:14:54+5:30
कडा : आष्टी तालुक्यातील विविध खेड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या कामामध्ये गैरप्रकार होऊ नये यासाठी १८८ टँकरला जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे.
अखेर १८८ टँकरला जीपीएस यंत्रणा
कडा : आष्टी तालुक्यातील विविध खेड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या कामामध्ये गैरप्रकार होऊ नये यासाठी १८८ टँकरला जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी भाग म्हणून आष्टी तालुक्याकडे पाहिले जाते. तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने दरवर्षीच येथे ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. तालुक्यात डोंगरी भागही मोठ्या प्रमाणावर असल्याने भूगर्भातही फारशी पाणी पातळी नाही. त्यामुळे फेब्रुवारीपासूनच तालुक्यातील गावागावातील ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके बसू लागतात.
गेल्या वर्षी आष्टी तालुक्यात ५०० पेक्षा अधिक टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. अनेकदा टँकर चालक ग्रामस्थांना पाणीपुरवठा न करताच केवळ कागदी घोडे नाचवून पाणीपुरवठा केल्याचे दाखवित असल्याचा आरोपही ग्रामस्थातून होत होता.
आष्टी तालुक्यात या वर्षीही २०० पेक्षा अधिक गाव , खेड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या पाणी पुरवठ्याच्या कामात अनियमितता होऊ नये यासाठी टँकरना जीपीएस यंत्रणा लावण्याची मागणी ग्रामस्थातून होत होती. ग्रामस्थांच्या मागणीचा प्रशासनाने गांभिर्याने विचार केला. यानंतर सर्व १८८ टँकरला जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली. ज्या टँकरना जीपीएस यंत्रणा बसविली जाणार नाही अशा टँकरचे बिल न देण्याचे आदेशही जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिले होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सर्वच टँकरना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आल्याचे तहसीलदार यांनी सांगितले. जीपीएस यंत्रणा बसविल्याने ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
जीपीएस यंत्रणेची होती मागणी
बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई आष्टी तालुक्यात.
आष्टी तालुक्यातील जवळपास २०० गाव, वाडी, वस्त्यांना होतोय टँकरने पाणीपुरवठा.
पाणीपुरवठ्याच्या कामात अनियमितता होऊ नये यासाठी जीपीएस यंत्रणा बसविण्याची होत होती ग्रामस्थांची मागणी.
अनियमितता रोखण्यासाठी जीपीएस यंत्रणा
आष्टी तालुक्यात पाणीटंचाई असल्याने मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या संदर्भात काही तक्रारी आल्या होत्या. ग्रामस्थांना पाणी मिळावे, अनियमितता होऊ नये यासाठी १८८ टँकरना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आल्याचे तहसीलदार राजीव शिंदे यांनी सांगितले.