अखेर चौकशीसाठी समिती स्थापन
By Admin | Updated: June 1, 2014 00:24 IST2014-05-31T23:48:15+5:302014-06-01T00:24:55+5:30
हरी मोकाशे , लातूर कुटूंब नियोजनाच्या बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान जंतूसंसर्गाने बळी गेलेल्या महिलेच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे़

अखेर चौकशीसाठी समिती स्थापन
हरी मोकाशे , लातूर कुटूंब नियोजनाच्या बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान जंतूसंसर्गाने बळी गेलेल्या महिलेच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अखेर शनिवारी जिल्हा आरोग्य विभागाने पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे़ एक आठवड्यापासून या प्रकरणाची चौकशी करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित होताच ही दखल घेण्यात आली आहे़ उदगीर येथे सालगडी म्हणून मालू टाळीकुटे हे आपली पत्नी ललिताबाई टाळीकुटे व तीन मुलांसमवेत काम करीत होते़ ९ महिन्यांपूर्वी बाळंत झालेल्या ललिताबाई टाळीकुटे यांच्यावर कुटुंबनियोजनाची बिनटाक्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र या महिलेस शस्त्रक्रियेवेळी जंतुसंसर्ग झाल्याने तिचा उपचारावेळी मृत्यू झाला होता़ हे प्रकरण घडून आठवड्याचा कालावधी उलटला असतानाही जिल्हा आरोग्य अधिकार्यांकडून कुठलीही दखल घेतली जात नव्हती़ त्यामुळे लोकमतमधून ३१ मे रोजी चौकशीत आरोग्य विभागच बेफिकिरच! या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले़ त्याची दखल याच दिवशी पाच सदस्यीय चौकशी समितीची स्थापना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ सुधाकर शेळके यांनी केली आहे़ कुटुंबकल्याण गुणवत्ता अभिवचऩ़़ कुटुंबकल्याण गुणवत्ता अभिवचन समिती असे या चौकशी समितीचे नाव आहे़ यात निलंगा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक, चाकूर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक, रेणापूरच्या ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक, सी़एस़ कार्यालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी आणि जि़प़च्या आरोग्य विभागातील एक अधिकारी यांचा या समितीत समावेश आहे़ मयत महिलेच्या नातेवाईकास शासनाच्या वतीने तात्पुरती ५० हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे़ त्यासाठीचा प्रस्ताव शनिवारी तयार करण्यात आला आहे़ येत्या दोन दिवसांत ही मदत देऊ, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ सुधाकर शेळके यांनी सांगितले़ या महिलेच्या शवविच्छेदनाचा मुख्य वैद्यकीय अहवाल अद्यापही प्राप्त झाला नाही़ या अहवालासाठी औरंगाबाद, लातूरकडे चौकशी करण्यात येत आहे़ हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे उदगीर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आऱ के़ डुणगे यांनी सांगितले़