...अखेर कळंब उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी
By Admin | Updated: January 3, 2017 23:25 IST2017-01-03T23:23:02+5:302017-01-03T23:25:58+5:30
कळंब : येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला असून, ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले आहे़

...अखेर कळंब उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी
कळंब : येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला असून, ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले आहे़ ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन झाल्याने येथील तज्ज्ञ डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची पदे वाढली असून, वाढणाऱ्या सुविधांमुळे रुग्णांसह नातेवाईकांची मोठी सोय होणार आहे़
कळंब शहरात साधारणत: १९८७ साली ग्रामीण रुग्णालय सुरू झाले होते. परळी रोडवरील विस्तृत भूखंडावरील ग्रामीण रुग्णालयावर शहरासह लगतच्या डिकसळ भागातील जवळपास ४० हजार लोकसंख्येच्या आरोग्याचा भार आहे. याशिवाय तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रातून रेफर होणारे रुग्ण, आपत्कालीन रुग्णही याच रुग्णालयात येतात़ दररोज किमान २५० ते कमाल ३०० बाह्यरुग्णांची याठिकाणी नोंद होते़ तर २० ते २५ आंतररुग्णांचीही नोंद होते. कुंटूबकल्याण शस्ञक्रिया, प्रस्तूतीसाठीही येथील आरोग्य सेवाही येथून पुरविली जाते़ त्यातच इमर्मजन्सी स्वरूपातील जळीत, विषप्राषण, अपघात यामधील गंभिर व तातडीचा उपचार कराव्या लागणाऱ्या व्यक्तींना तालुकाभरातून येथील ग्रामीण रुग्णालयातच रेफर केले जात आहे. वाढते रुग्ण आणि सुविधांचा अभाव, तज्ज्ञांचा अभाव यामुळे रुग्णांना अंबाजोगाई, बार्शी, लातूर, उस्मानाबादकडे रेफर करावे लागत होते़ त्यामुळे या ३० खाटाच्या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी होत होती़ वाढती मागणी पाहता मराठवाडा विकास कार्यक्रमातंर्गत येथील खाटांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेवून आॅगष्ट २०११ मध्ये इमारतीसाठी ५३ लक्ष रुपयाचा निधीही मंजूर करण्यात आला. यातून इमारत बांधकाम पूर्ण होवून २०१३ मध्ये इमारतीचा ताबा घेवून वापरही सुरू झाला होता. परंतु, श्रेणीवर्धन न झाल्याने खाटांची संख्या वाढूनही याचा रुग्णांना फायदा होत नसल्याचे दिसून येत होते. तालुकावासियांच्या मागणीला सोमवारी अखेर मुर्त स्वरूप आले़ आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांनी जाहीर केलेल्या १११ नव्या आरोग्य संस्थात कळंब येथील ५० खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयाचा समावेश आहे. यामुळे तालुक्यातील शिराढोण येथील ग्रामीण रुग्णालाया पाठोपाठ आता कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयाचाही प्रश्न मार्गी लागला आहे.