औरंगपुऱ्यात रात्री फिल्मी स्टाईल लूट
By Admin | Updated: September 15, 2015 00:35 IST2015-09-15T00:02:49+5:302015-09-15T00:35:28+5:30
औरंगाबाद : नोकराच्या मदतीने कापड व्यावसायिकाची ९५ हजार रुपयांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली.

औरंगपुऱ्यात रात्री फिल्मी स्टाईल लूट
औरंगाबाद : नोकराच्या मदतीने कापड व्यावसायिकाची ९५ हजार रुपयांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे या टोळीचा प्रमुख साथीदार बॅग हिसकावतानाच पकडला गेला होता. ही घटना रविवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास स. भु. कॉलेज परिसरात घडली.
नरेश साळवे, वैभव मालोदे, अमोल खेडकर, विशाल चव्हाण, विकी सोनवणे आणि प्रकाश चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले की, टिळकपथ येथील कापड दुकानदार मदनलाल बोरा हे रविवारी रात्री आपले दुकान बंद करून एस. बी. कॉलनी येथील घरी जात होते. स. भु. महाविद्यालयाच्या आतील गेटजवळ आरोपींनी त्यांना अडविले. धक्काबुक्की करून त्यांच्याकडील ९५ हजार रुपये रोकड असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मोठ्या शिताफीने बॅग हातात पक्की धरून ठेवली आणि आरडाओरड करीत नरेशला पकडले. नरेशला पकडल्याचे दिसताच त्याचे सहकारी पळून गेले. या घटनेची माहिती नागरिकांनी क्रांतीचौक पोलिसांना दिली. पोलीस हेडकॉन्स्टेबल अन्वर शेख, पोहेकॉ. नितीन चौधरी, प्रकाश डोंगरे, संतोष मुदिराज, समद पठाण, नवनाथ परदेशी यांनी त्यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने अन्य आरोपींची नावे सांगितली. रात्रीतून विशाल चव्हाण, विकी सोनवणे आणि प्रकाश चव्हाणला पकडण्यात आले. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. अन्य आरोपी वैभव आणि खेडकर यांना सोमवारी रात्री पकडल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी अमोल खेडकर हा बोरा यांच्या दुकानात कामाला होता. त्याने काही दिवसांपूर्वी काम सोडले. बोरा रोख पैसे घेऊन एकटेच घरी जातात, अशी माहिती त्याने नरेश आणि त्याच्या साथीदारांना दिली.