बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल
By Admin | Updated: July 5, 2017 00:20 IST2017-07-05T00:18:46+5:302017-07-05T00:20:19+5:30
नांदेड : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या ५२० पैकी ७९ बोगस डॉक्टरांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नोटिसा बजावल्या आहेत़

बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल
भारत दाढेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या ५२० पैकी ७९ बोगस डॉक्टरांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नोटिसा बजावल्या आहेत़ त्यापैकी ४८ बोगस डॉक्टरांनी आपले व्यवसाय बंद केले असून सात बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल केले आहेत़
तालुकास्तरीय समितीकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे जि़ प़ आरोग्य विभागाकडून बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आल्यामुळे बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले़ ग्र्रामीण भागात ५२० अधिकृत वैद्यकीय व्यवसायिक असून ७९ अनधिकृत वैद्यकीय व्यवसायिक आढळून आले़ वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टर व त्यांच्या दवाखान्याची तपासणी आरोग्य पथकाने केल्यानंतर दोषी आढळलेल्या ३२५ रूग्णालयांचा अहवाल जि़ प़ च्या आरोग्य विभागाकडे सादर करण्यात आला़ सर्वच तालुक्यांत आरोग्य पथकाने २७ मार्च ते १५ एप्रिलदरम्यान खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टर व त्यांच्या दवाखान्याची तपासणी केली़
यामध्ये संबंधित डॉक्टरकडे प्रमाणिक पदवी, बॉम्बे नर्सिंग अॅक्ट होमचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रमाणपत्र, स्थानिक प्राधिकरणाची परवानगी, फायर सेफ्टी, याशिवाय बाह्यरूग्ण नोंदी, आंतररुग्ण नोंदी, दुकाने अधिनियम आदी बाबींची तपासणी करण्यात आली़ तपासणीदरम्यान दवाखान्यात बॉम्बे नर्सिंग अॅक्ट होमचे प्रमाणपत्र , महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र, स्थानिक प्राधिकरणाची परवानगी, बायोमेडिकल प्रमाणपत्रांचा अभाव असणे तसेच फायर सेफ्टी न बसविणे, शॉप अॅक्टची परवानगी न घेणे, पदवी नूतनीकरण न करणे आदी त्रुटी आढळून आल्या होत्या़ या अहवालाच्या आधारे जि़ प़ आरोग्य विभागाने नांदेड तालुक्यातील १, धर्माबाद १, हिमायतनगर ३ व उमरी तालुक्यातील २ अनधिकृत वैद्यकीय व्यवसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तसेच जिल्ह्यातील अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई संदर्भात जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक ३ जुलै रोजी घेण्यात आली़ बैठकीत अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यावर गुन्हे, दंडात्मक कारवाई, शिक्षा याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले़ यावेळी भोकर तालुक्यात बोगस डॉक्टरांनी पुन्हा वैद्यकीय व्यवसाय सुरू केल्याचे निदर्शनास आणले़ तेव्हा संबंधित बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.